पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून कोवाड, कालकुंद्री ते किटवाड रस्त्याचे काम मार्गी लावू ....! खा. धनंजय महाडिक - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2023

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून कोवाड, कालकुंद्री ते किटवाड रस्त्याचे काम मार्गी लावू ....! खा. धनंजय महाडिक

खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे रस्त्यासंबंधी निवेदन देताना कालकुंद्री, किटवाड व कोवाड येथील ग्रामस्थ.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
    गेली अनेक वर्षे दुरावस्थेत असलेल्या कालकुंद्री ते किटवाड व कोवाड ते कालकुंद्री रस्त्याची पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून दुरुस्ती व पुनर्बांधणी व्हावी या मागणीसाठी तिन्ही गावच्या शिष्टमंडळाने खासदार धनंजय महाडिक व बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी खा महाडिक यांनी हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन ग्रामस्थांच्या शिष्टमंडळास दिले.
    कोवाड, कालकुंद्री ते किटवाड हा एकूण ६ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. यापैकी कालकुंद्री ते किटवाड टप्पा ४ किमी लांबीचा असून यापैकी कालकुंद्री गावानाजीकचा केवळ १ किमी रस्ता १० वर्षांपूर्वी एकदाच खडी व डांबरीकरण झाला होता. सद्यःस्थितीत या रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली असून रस्त्यावर खड्डे व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. उर्वरित सुमारे ३ किमी भागावर कधीच खडीकरण ही झालेले नाही. दोन्ही गावांदरम्यान लघुपाटबंधारे धरण क्र. १ असून सांडव्यावरून पलीकडे जाण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने सांडव्या नजिक मार्ग खंडित झाला आहे. येथे पूल बांधणे गरजेचे आहे. तीच अवस्था कालकुंद्री ते कोवाड या २ किमी रस्त्याची आहे. यापूर्वी कधीच खडीकरण ही न झालेला हा रस्ता असून दोन्ही गावांदरम्यान असलेल्या ताम्रपर्णी नदीवर पूल नाही. सद्यःस्थितीत धोका पत्करून नावेतून येजा चालते. एकंदरीत ६ किमी लांबीचा रस्ता व दोन पूल गरजेचे असताना काही दिवसांपूर्वी आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून केवळ ४० लाख रुपये या कामी निधी मंजूर झाल्याचे समजते. एवढ्या तुटपुंज्या निधीत ही सर्व कामे होणे अशक्य असल्याने वाढीव  निधीसाठी शिष्टमंडळाने खा. महाडिक यांना साकडे घातले आहे. १५-२० वर्षांपूर्वी माजी मंत्री भरमूआण्णा  पाटील व असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत ताम्रपर्णी वरील पुलाचे भूमिपूजन धनंजय महाडिक यांनी केले होते. तथापि या कामाची प्रत्यक्षात कधीच सुरुवात झाली नाही! हा इतिहास आहे. त्यामुळे सध्या दुसऱ्या टर्ममध्ये खासदार झालेल्या धनंजय महाडिक यांच्याकडून ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
    हा रस्ता झाल्यास कोवाड ते बेळगाव अंतर कमी होणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांचा कर्नाटकातील हुक्केरी, बेळगाव आदी तालुक्यांशी संपर्क सुलभ होणार आहे. यातून शाळा कॉलेजचे विद्यार्थी, आजारी रुग्ण, शेतकरी यांची सोय व उद्योग व्यवसाय वाढीस मदत होणार आहे. निवेदनाची प्रत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री दीपक केसरकर आदींना दिली आहे. दरम्यान मार्गावरील सर्व शेतकऱ्यांनी रस्ता रुंदीकरणासाठी आपल्या जमिनी विना मोबदला देण्याची हमी स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्याचे समजते.
       यावेळी माजी सरपंच आप्पाजी वर्पे, गुरुनाथ पाटील, तानाजी पाटील, शंकर मुर्डेकर, शंकर सांबरेकर, भरमू ततोबा पाटील, अनिल तेऊरवाडकर, जानबा पाटील (कालकुंद्री), माजी सरपंच परसू पाटील, कृष्णा नांदवडेकर, सदानंद वर्पे (किटवाड), शिवाजी आडाव (कोवाड) यांचेसह जिप. सदस्य ॲड हेमंत कोलेकर, धनंजय महाडिक युवाशक्ती तालुकाध्यक्ष मायाप्पा पाटील आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment