रस्ता नसल्याने धनगरवाड्यावरील महिलेचा प्रसुतीसाठी झोळीतून पावसात भिजत ३ किमीचा प्रवास, दैव बलवत्तर म्हणून बचावली, चंदगड तालुक्यातील घटना.......... - चंदगड लाईव्ह न्युज

23 August 2023

रस्ता नसल्याने धनगरवाड्यावरील महिलेचा प्रसुतीसाठी झोळीतून पावसात भिजत ३ किमीचा प्रवास, दैव बलवत्तर म्हणून बचावली, चंदगड तालुक्यातील घटना..........

 

सौ. पल्लवी झोरे

तेऊरवाडी / एस. के. पाटील

        चंदगड तालुक्यातील कानुर धनगरवाड्यारील पल्लवी भागोजी झोरे (वय वर्ष २०) हिला प्रसुती कळा सुरू झाल्याने रात्री पावसातच केवळ रस्ता नसल्यामुळेच घोंगड्याच्या  झोळीत घालून चौघांनी धरून पायवाटेने जंगलातून मध्यरात्री प्रसुतीसाठी तीन किलोमीटर घेऊन गेले. केवळ दैव बलवंतर म्हणून बाळ व बाळंतीण सुखरूप... खरं तर जिथं रस्ता नाही, तेथे आपत्कालीन व्यवस्था काय..? हा प्रश्न मात्र स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही अनुत्तरितच आहे.

अंधारातून बॅटरीच्या प्रकाशात पल्लवीला घोंगडीच्या झोळीतून घेऊन जाताना

      धनगरवाडा म्हटलं की समोर येतो ते घनदाट जंगल, सह्याद्रीच्या उंच उंच डोंगर रांगा.. अन् या दऱ्याखोऱ्यात वसलेले वाडे... सायंकाळी सहा वाजले की वेगवेगळ्या पशु पक्षांचे आवाज कधी गव्यांचे हंबरणे...तर कधी कोल्ह्याची कोल्हे कोई...तर कधी कधी बिबट्याचा आवाज...तर कधी कधी छातीत धडकन धडकी भरवणारी पट्टेरी वाघाची डरकाळी...वाघाची डरकाळी ऐकली की छातीत धस्स.. होते...सह्याद्रीच्या कुशीत आणि घाटमाथ्यावर वसलेला  कानुर धनगरवाडा..याच धनगर वाड्यावर दि. २०/८/२०२३ रोजी रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान सौ. पल्लवी भागोजी झोरे (रा.धनगरवाडा, कानुर खुर्द, ता. चंदगड, जि कोल्हापुर) हिला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या.  

       खरंतर कोणत्याही धनगर वाड्यावर एखादा रात्रीचा आजारी पडला किंवा एखाद्या महिलेस प्रसव काळा सुरू झाल्या की धनगर वाड्यावरील वातावरण तणावपूर्ण होते.. अगदी प्रत्येकाच्या छातीत धस होतं. देश स्वतंत्र होऊन 76 वर्षे झाली देशाचा विकास झाला..? रेल्वे मेट्रो.. विमान.. यावर कहरच.. परवा बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हवेतून उडणारी बस ही देऊ असे पुणे करांना सांगितले. परंतु या धनगर वाड्यावर साधा रस्ता, आरोग्याच्या सोयी, अंगणवाडी, शाळा यासारख्या मुलभूत सोई सुविधाही पोहचलेल्या नाहीत. 

        खरं तर विकासाची पहाट धनगरवाड्यार उगवलीच नाही. अनेक नेते आले आणि आश्वासनाचे खैरात करून निघून गेले. परंतु धनगरवाडे मात्र जिथे आहे तिथेच राहिले. त्यापैकीच कानुर धनगरवाडा कोल्हापूर पासून सर्वसाधारणपणे दीडशे किलोमीटर दूरवर. कानूर या गावापासून ९ किलोमीटर जंगलात तर या धनगर वाड्यापर्यंत जायला रस्ताच नाही. अवतीभोवती घनदाट जंगल, जंगलात वन्य प्राण्यांचा वावर हा नेहमीचाच,  कधी कधी हत्ती गवगव्यांचा कळप रस्त्यावर बसलेला, तर कधी भक्ष्य पकडण्यासाठी  दबा धरुन  बसलेला बिबट्या, तर कधी कधी जवळ माणसं असतानाही समोर येऊन गाई म्हैसीवर हल्ला चढवून झाडीत ओढून रूबाबत घेऊन जाणारा पट्टेरी वाघ. जर हे दिवसा घडत असेल तर मग रात्री जंगलातून झाडीतून पायवाटेने जाताना काय अवस्था होत असेल..? याची कल्पना करावी. 

       पल्लवीला रात्री १२ वाजता प्रसवकळा सुरू झाल्या. परंतु आता करायचे काय? रस्ता नाही... हा सगळ्यांच्या समोर प्रश्न पडला. अँब्युलंसला फोन केला... जो पर्यंत रस्ता आहे तिथं पर्यंत येऊन थांबतो म्हणून... सांगितले. शेवटी अवघडलेल्या पल्लवीला. झोळीत घोंगडी अंथरले त्यावर पल्लवीस झोपवले...चारी बाजुला चौघांनी धरुन धोकादायक प्रवास सुरू झाला. वरून धो... धो.... पाऊस पडत होता. पावसातच काळोखात किर्य झाडीतुन पायवाटेने यशवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी  कोडिबा येडगे,  चिचु येडगे, कविता येडगे, जयश्री झोरे, भागोजी झोरे (नवरा), कोडिबा झोरे, सासरे धोंडाबाई झोरे व सासु या सगळ्यांचा पल्लवीस घेऊन प्रवास सुरू झाला. वेदनेने पल्लवी विव्हळत होती. अंधारात ठेच लागली की  तिचा विव्हळण्याचा आवाज वाढत होता. तिची तळमळ आणि आवाज ऐकून जंगल मात्र निस्तध. झाले होते. 

         प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती. जंगलातून पायवाटेने प्रवास, ओढे -नाले भरून वहात होते. रातकिड्यांची किरकिर.. भयान शांतता .. मनात भीती.. घालत होती...कदाचित वाघ आला तर...? अचानक गव्याने धडक मारली तर काय होईल... अशातच अंदाजानं पावले टाकीत बॅटरीच्या उजेडात ३ किलोमीटर  रात्री  साडेतीन वाजता धनगर वाड्यावरील बांधव  चालत रस्त्यावर पोहचले. ॲम्बुलन्स येऊन रस्त्यावर थांबली होती. तिला अंबुलन्स मध्ये घालून चंदगडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर प्रसुती झाली. बाळ बाळंतीन सुखरूप आहे. 

       दुर्गम भागातील महिलेस प्रसुतीसाठी रस्ता नसल्याने दवाखान्यात आणताना वाटेतच मृत्यू झाला होता.. हा विषय पावसाळी अधिवेशनात  गाजला होता. राधानगरी तालुक्यात केवळ रस्ता नसल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने अशीच घटना घडली होती. त्यामध्ये बाळ आणि बाळाची आई या दोघांचाही मृत्यू झाला होता. बाळाला हे सुंदर जग पहाण्यागोदरच जगाचा निरोप घ्यावा लागला होता. भुदरगड, आजरा तालुक्यातही अशाच घटना वारंवार घडत आहेत. तरीही झोपलेले प्रशासन जागे का होत नाही. पुन्हा एकदा धनगर वाड्यावरील मूलभूत सुविधांचा प्रश्न  ❓ ऐरणीवर आला आहे. यशवंत क्रांती संघटनेची आरोग्य दूत नेमणूक करण्याची मागणी पुर्ण झाली असती तर दोन तीन दिवस अगोदरच पल्लवीस दवाखान्यात दाखल करण्यात आले असते. भोंगळ कारभारामुळे हि मागणी मंत्रालयात अडकून पडली आहे. महिला नेत्यांनो प्रसुती म्हणजे स्त्रीचा पुर्नजन्मच वेदना काय असतात..? हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे. मग का नाही पुढे येऊन आवाज उठवत..? मंत्री आमदार खासदारांनो.. पल्लवीच्या जागी तुमची मुलगी... !  पत्नी...! बहिण....! असती तर जरा कल्पना करा काय अवस्था झाली असती....? 

        मग का नाही मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करत...? याबाबत अनेक वेळा चर्चा करूनही धनगर वाड्यावरील सोयी-सुविधा पोहोचवण्याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधीमध्ये उदासीनता असल्यामुळे धनगरवाड्यांचे वनवास संपत नाही. एखादी दुदैवाने घटना घडली की चार दिवस माध्यमातून चर्चा होते. नंतर मात्र येरे माझ्या मागल्या अशीच अवस्था. आम्हाला नको मेट्रो. आम्हाला समृद्धी महामार्ग ही नको. गडकरी साहेब. हवेतून जाणारी बसही आम्हाला नको. शक्य झाले तर आमचेकडे फक्त माणूस म्हणून बघा. आणि फक्त कसला ही असो निदान गाडी जाईल असा फक्त रस्ता तरी करा. निदान बैलगाडी तरी जाईल असा..! हिच धनगरवाड्यारील बांधवांची भावना... 


  दुर्गम भागात आरोग्य दूत यांची नेमणूक करा - संजय वाघमोडे 

       कोल्हापूर जिल्ह्यात असे अनेक  दुर्गम धनगरवाडे आहेत. या ठिकाणी आरोग्य दूत नेमण्याची मागणी शासनाकडे केली आहे. अशा नेमणूका झाल्या तर या प्रकारच्या दुर्घटनाना वेळीच पायबंद घालता येईल. तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या अशा लोकांना वेळीच उपचार मिळतील यात शंका नाही. अशी मागणी यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment