सरोळीच्या ओंकार ची प्रो कबड्डी साठी तेलगू टाईटन्स मध्ये निवड, चंदगड तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट... - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2023

सरोळीच्या ओंकार ची प्रो कबड्डी साठी तेलगू टाईटन्स मध्ये निवड, चंदगड तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट...

 

ओंकार नारायण पाटील

मजरे कार्वे / सी. एल. वृत्तसेवा

     सरोळी (ता. चंदगड) येथील माजी सरपंच व सह्याद्री को-ऑप -सोसायटी तुडये शाखेचे सल्लागार नारायण मोनाप्पा पाटील यांचे सुपुत्र ओंकार नारायण पाटील याची भारतातील प्रसिद्ध असलेल्या प्रो-कबड्डी स्पर्धेसाठी  निवड झाली आहे. 

      सरोळी सारख्या एका छोट्याशा गावातील तरुणाची तेलगू टायटन्सच्या संघामध्ये निवड झाल्याने सरोळीसह चंदगड तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. येथील ग्रामस्थातून, कबड्डी खेळाडूंकडून व कबड्डी प्रेमीकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. हैद्राबाद येथे झालेल्या निवड चाचणीत त्याची निवड झाली आहे. तेलगू टायटन्सने आपल्या संघामध्ये त्याला संधी दिली आहे.

           19 वर्षाच्या या नवोदित खेळाडूने आपल्या आक्रमक, चपळ, तंत्रशुद्ध आणि अष्टपैलू खेळाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. 6 फूट उंच असलेल्या ओंकार पाटीलने आपल्या शैलीदार खेळाने कबड्डी प्रेमीना सुखद धक्का दिला आहे. रावज अकॅडमी कोल्हापूर येथे प्रशिक्षक डॉ. श्री. रमेश भेंडिगिरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ओंकार पाटील प्रो कबड्डीच्या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. आक्रमकता, चपळता, युक्ती आणि शक्ती याच्या जोरावर ओमकार यशस्वी होणार असा विश्वास प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडिगिरी यांनी व्यक्त केला.

     याआधी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा, युवा कबड्डी स्पर्धा, राज्यस्तरीय कनिष्ठ चॅम्पियनशिप स्पर्धा अशा अनेक कबड्डी स्पर्धामध्ये ओमकारने खेळाचे सुरेख दर्शन घडवले आहे. यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू कॉलेज मध्ये बी. ए. च्या प्रथम वर्षात तो शिकत आहे.त्याचे प्राथमिक शिक्षण सरोळी येथील मराठी शाळेत झाले तर हायस्कूलचे शिक्षण राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन शिंगणापूर (कोल्हापूर) येथे झाले.

           एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील युवकांने मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. सिद्धार्थ देसाई, सुरज देसाई यांच्या प्रमाणे ओमकारनेही आपल्या गावासह चंदगड तालुक्याचे व कोल्हापूर जिल्ह्याचे नाव मोठे करावे. त्याला मिळालेल्या संधीचे सोने करावे. ओंकारचे वडील  नारायण पाटील, आई सौ. सुमन पाटील यांची प्रेरणा त्याच्या यशाची रहस्य आहे.

प्रो-कबड्डीचा चंदगड तालुक्यातील तिसरा खेळाडू

       चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडीच्या सुरज देसाई, सिद्धार्थ देसाई यांची यापूर्वी प्रो-कबड्डी लिगमध्ये निवड झाली होती. त्यानंतर आता चंदगड तालुक्यातून प्रो-कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेला ओंकार हा तिसरा खेळाडू बनला आहे. 

No comments:

Post a Comment