पतसंस्थेच्या सचिवाकडून ३७ लाखांचा अपहार...! चंदगड तालुक्यात खळबळ - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2023

पतसंस्थेच्या सचिवाकडून ३७ लाखांचा अपहार...! चंदगड तालुक्यात खळबळ

                       


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड येथील राजमाता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सचिवाने सुमारे ३७,४९,५४३/- (३७ लाख ४९ हजार ५४३) रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतची फिर्याद चंद्रकांत पुरुषोत्तम दाणी, चंदगड यांनी १५ /०८/२०२३ रोजी सायंकाळी ६.३८ वाजता चंदगड पोलिसांत दिली आहे. या घटनेमुळे चंदगड तालुक्यातील पतसंस्था वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

        यातील संशयीत नंदकुमार बाबुराव घोरपडे उर्फ निंबाळकर (रा. चंदगड, ता. चंदगड) हा संस्थेत १ मे १९९७ पासून मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. त्याने संचालक मंडळाला विश्वासात न घेता आपल्या पदाचा गैरवापर करून संस्थेतील रोख शिलकेच्या मर्यादेचे उल्लंघन करून संस्थेतील सभासदांच्या बोगस व बनावट सह्या करून त्यांच्या खात्यावरील रक्कमांचा स्वतःचे फायद्यासाठी वापर केला आहे. तसेच सभासदांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे करून ती रक्कम हडप केल्याचे १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२२ चे लेखापरीक्षणात उघडकीस आले आहे. 

        याबाबतचा अहवाल सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चंदगड यांनी ५ डिसेंबर २०२२  रोजी सादर केला आहे. यावरून मॅनेजर  घोरपडे यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४०९, ४२० प्रमाणे गुन्हा नोंद करून उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याचे चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले. यातील संशयिताला अद्याप अटक झालेली नाही. घटनेची नोंद चंदगड पोलिसांत झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब कसेकर व मुल्ला हे अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment