हेरे सरजांम प्रकरणी शेतकऱ्यांचे चंदगडला बेमुदत उपोषण सुरू, उपोषण मागे घेण्याबाबत प्रशासनाकडून मनधरणी, हेरे सरजांम प्रकरणी ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याची उपोषण कर्त्याची भुमिका - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2023

हेरे सरजांम प्रकरणी शेतकऱ्यांचे चंदगडला बेमुदत उपोषण सुरू, उपोषण मागे घेण्याबाबत प्रशासनाकडून मनधरणी, हेरे सरजांम प्रकरणी ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याची उपोषण कर्त्याची भुमिका

चंदगड / प्रतिनिधी

        चंदगड तालुक्यातील ४७ गावातील शेतकऱ्यांच्या हेरे सरंजामच्या वर्ग -२ च्या जमिनी वर्ग -१ करण्याचे काम प्रलंबित राहिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. प्रशासनाने तत्काळ हा प्रश्न सोडवावा यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी आज चंदगड तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते रवी उर्फ धोंडिबा नाईक (आमरोळी) व माजी सैनिक रणजीत दत्तू गावडे (इनाम म्हाळुंगे), अनिल रेगडे (अडकुर) या शेतकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.

          चंदगड तालुक्यातील ४७ गावातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनलेल्या हेरे सरंजामाच्या वर्ग -२ असलेल्या जमिनी वर्ग -१ करण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. २००१ साली शासननिर्णय होऊन हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. परंतु महसूल खात्यातील लालफितीच्या कारभारामुळे हा प्रश्न शासनाने सोडवूनही प्रत्यक्ष त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुढाकार घेतला होता. २६ जानेवारी २०२० पर्यंत हा प्रश्न संपविण्याचे आदेश दिले गेले होते . परंतु कोरोनामुळे काम रखडले. दुर्देवाने या प्रश्नाची जाण असलेले जिल्हाधिकारी यांची बदली झाली आणि हा प्रश्न पुन्हा थंड पडला. 

             प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वर्ग -२ च्या वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनींचा खरेदी - विक्री व्यवहार, कर्ज काढता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीत अडसर ठरणारा हेरे सरंजामचा प्रश्न निकालात काढून वर्ग -२ च्या जमिनी वर्ग १ करण्यासंबंधी बरीच कागदपत्रे याअगोदर शासनाकडे सादर केली आहेत. त्याची दोनशेहे पट रक्कम सुध्दा अदा केली आहे. तरी सुध्दा ही प्रकरणे निकालात न काढता गरिब शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम प्रशासनाकडून चालू केले आहे. प्रशासनाने दिलेल्या नोटीसीतील कागदपत्रे,फेरफार, उतारे महसूल खात्यातच मिळतात.पण शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाहीत. याच गोष्टीचा गैरफायदा तहसिल,प्रांत कार्यालयातील कर्मचारी घेऊन शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत.

       दोन-दोन वर्ष पूर्ण झालेली प्रकरणे जाणिवपुर्वक प्रांत कार्यालयात अडवून ठेवली आहेत. दरमान तहसीलदार राजेश चव्हाण, नायब तहसीलदार हेमंत कामत यानी अंदोलकाना हेरे सरजांम कामी तलाठी, मंडल अधिकारी यांची नेमणूक करून प्रलंबित प्रकरणे निर्गत करून प्रांतकार्यालयाकडे पाठवण्याच्या सुचना देण्यात आल्या असून आपण उपोषण मागे घ्यावे अशी मनधरणी केली. मात्र आज पर्यंत तहसील व प्रांत कार्यालयातील कर्मचारी वर्गाकडून शेतकरी वर्गाला चुना लावण्याचे काम होत असल्याने जोपर्यंत प्रलंबित प्रकरणे पूर्ण होत नाहीत. तो पर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भुमिका  रवि नाईक, रणजीत गावडे,अनिल रेगडे यांनी घेतली आहे.

No comments:

Post a Comment