तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
हत्तरगी येथील पुरातन श्रीहरी काका गोसावी ऋग्वेदी भागवत मठात दिनांक 6 ते 8 सप्टेंबर अखेर तीन दिवस गोकुळ अष्टमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 6 सप्टेंबर रोजी आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे 11,001/-- रुपये रोख बक्षीस व मानचिन्ह ठेवण्यात आले आहे. द्वितीय क्रमांकास रुपये 7000 तृतिय 5000 रूपये, उत्तेजनार्थ रुपये 3000/-- रोख व मानचिन्ह तसेच उत्कृष्ट वादक व गायक यांना प्रत्येकी रुपये 1001/-- रोख व मानचिन्ह देण्यात येणार आहे.
या आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत भजनी मंडळ संघानी सहभागी व्हावे असे आवाहन पीठाधीश डॉक्टर आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी यांनी केले आहे. दिनांक ६ सप्टेंबर रोजी भजन सम्राट स्पर्धा - सकाळी अकरा वाजता होईल. बेळगावचे पालकमंत्री नामदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. रात्री दहा वाजता सौ. स्वरदा पटवर्धन- हरिदास (सांगली) यांचे श्रीकृष्ण जन्मसोहळा नारदीय कीर्तन होणार आहे. दिनांक ७ सप्टेंबर रोजी पारणे, प्रवचन व भजन यासह सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांची भक्ती संगीत गायन सेवा यासह विविध सांगितिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .माण (तालुका शाहूवाडी) येथून आनंद दिंडी हत्तरगी येथे येणार आहे.
दिनांक 8 सप्टेंबर रोजी गोपाळकाला व महाप्रसाद वाटप होणार आहे. आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत सहभागी संघांना सादरीकरणास 18 मिनिटे वेळ असेल. या वेळेत किमान दोन अभंग व एक गवळण सादर करावी लागेल. या रचना संत रचितच म्हणजे गाथ्यामधील असाव्यात. सादरीकरण अभंग रचना मराठी व कानडी भाषेत असावेत. इच्छुक संघानी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत आपली नावे श्री हरी मंदिर हत्तरगी, जिल्हा बेळगाव येथे नोंदवावीत असे विश्वस्त मंडळाने आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment