'हत्ती हटाव' मागणीसाठी ७ तास रास्ता रोको आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2023

'हत्ती हटाव' मागणीसाठी ७ तास रास्ता रोको आंदोलन

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    तब्बल २२ वर्षे हत्तींच्या उपद्रवापासून त्रस्त झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांनी नुकताच मुंबई गोवा महामार्गावर ७ तास रास्ता रोको केला. गेल्या २३ वर्षात दोडामार्ग तालुक्यात वावरणाऱ्या हत्तींनी फळ बागा तसेच बागायत शेती नेस्तनाबूत केली आहे. अनेक वेळा आंदोलने करूनही केवळ आश्वासना पलीकडे वनविभाग व राज्यकर्त्यांनी ग्रामस्थांना काहीही दिलेले नाही. 

      यामुळे संतप्त नागरिकांनी दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करा मागणीसाठी नुकताच सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जुन्या मुंबई- गोवा महामार्गावर आक्रमक पवित्रा घेत तब्बल ७ तास रास्ता रोको केला. सकाळी ११ वाजता सुरू झालेले आंदोलन ५ वाजले तरी सुरू होते. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे वनविभागाची अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. शेवटी सायंकाळी ५ वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून मोबाईल वरून आंदोलकांसोबत संवाद साधला. 

   मंत्री केसरकर यांनी लवकरच वनमंत्री तिलारी खोऱ्यातील हत्ती बाधित परिसरात घेऊन तेथील ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतील व हत्तीमुक्त तालुका करण्यासाठी कायमस्वरूपी निर्णय घेतला जाईल...! असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. यावेळी दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यातील हजारोंच्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment