चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
पारगड- मोर्ले या बहुचर्चित राज्य मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम गेले काही महिने रखडलेले आहे. हे काम लवकरच मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. याबाबत नरेश झुरमुरे (मुख्य वनसंरक्षक नागपूर) यांनी आठवडाभरात मंजुरीची पूर्तता करुन प्रत्यक्ष कामातील अडथळे दूर केले जातील, असे आश्वासन दिले आहे.
मोर्ले (ता. दोडामार्ग) येथील माजी सरपंच तथा शिवसेना दोडामार्ग तालुका संघटक गोपाळ गवस यांनी नुकतीच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे यांची नागपूर येथे भेट घेऊन रखडलेल्या रस्ता कामामुळे नागरिकांपुढे निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा वाचला. रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच भूसंपादन झाले असून दुसऱ्या टप्प्यातील भू संपादन न झाल्याने वन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागास काम करण्यास मनाई केली आहे. हा मार्ग कोल्हापूर, बेळगाव व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना गोवा राज्याशी जोडणारा सर्वात जवळचा व सुलभ राज्यमार्ग असल्यामुळे लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे. याबाबत राज्याचे शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्य वनसंरक्षक यांना तात्काळ प्रस्ताव पाठवून खास बाब म्हणून भूसंपादन करून रस्त्याचे काम तात्काळ सुरू होईल यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एकंदरीत सन २०२४ मध्ये तरी हे रस्त्याचे काम शंभर टक्के पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल, अशी अशा या रस्त्यासाठी अनेक वेळा उपोषणे व आंदोलने करणाऱ्या चंदगड तालुक्यातील पारगड पंचक्रोशी व दोडामार्ग परिसरातील नागरिक बाळगून आहेत.
No comments:
Post a Comment