वाहतुकीच्या मार्गावर अडथळे करणाऱ्या तसेच डॉल्बी लावणाऱ्या गणेश मंडळांवर कठोर कारवाई करणार...! - पो. नि. संतोष घोळवे - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2023

वाहतुकीच्या मार्गावर अडथळे करणाऱ्या तसेच डॉल्बी लावणाऱ्या गणेश मंडळांवर कठोर कारवाई करणार...! - पो. नि. संतोष घोळवे

 

कोवाड (ता. चंदगड) येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व पोलीस पाटलांच्या बैठकीसाठी जमलेले मंडळाचे पदाधिकारी. 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

   गणेशोत्सव काळात जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे नेहमीच्या वाहतुकीच्या मार्गात मंडप किंवा अन्य प्रकारचे अडथळे निर्माण करतील. तसेच डॉल्बीचा वापर करतील अशा सर्व मंडळांवर न्यायालयीन आदेशानुसार कठोर कारवाई केली जाईल. अशा इशारा चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिला. ते कोवाड (ता. चंदगड) येथे पद्मश्री रणजीत देसाई सांस्कृतिक भवन येथे दि. २४ ऑगस्ट २०२३ रोजी पार पडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व पोलीस पाटलांच्या बैठकीत मार्गदर्शन करत होते. 

कोवाड येथे गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक संतोष घोळवे

     कोवाड दूरक्षेत्र ठाणे अंमलदार जमील मकानदार व कुशाल शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक घोळवे म्हणाले, ``गेल्या तीन-चार वर्षात कोरोना व अन्य तांत्रिक कारणास्तव होऊ न शकलेला गणराया वार्ड यावर्षी पुन्हा सुरू करणार आहोत. याचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील सर्व मंडळांनी समाज प्रबोधनात्मक देखावे, शालेय विद्यार्थी व समाजाभिमुख उपक्रम, विद्यार्थी, महिला, मुली व नागरिकांसाठी विविध गुणदर्शन, बौद्धिक व क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्यात. 

     डॉल्बीवर १०० टक्के बंदी राहणार असून लाऊड स्पीकर कायमस्वरूपी चालू न ठेवता आरतीच्या वेळी कमी आवाजात दीड दोन तास सुरू ठेवण्यात यावा. जेणेकरून अभ्यास करणारे विद्यार्थी, परिसरातील नागरिक, आजारी रुग्ण यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. फटाकेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. धार्मिक भावना भडकतील अशा प्रकारचे देखावे किंवा मोबाईलवर स्टेटस ठेवू नयेत. उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी. 

        गणपती आगमनाच्या मिरवणुका तसेच विसर्जन मिरवणुका रात्री दहा पूर्वी संपवाव्यात. शक्य असेल त्या मंडळांनी मंडप व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. असे आवाहन करताना पर्यायी मार्ग असला तरी नेहमीच्या रस्त्यावर मंडळाचे मंडप किंवा पेंडॉल घालून हरदरीत अडथळा केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

      शंभर टक्के मंडळांनी मंडप घालणे, स्पीकर लावणे, मिरवणूक काढणे याबाबत गणेश चतुर्थी पूर्वी आठ दिवस लेखी परवानगी घेणे अनिवार्य आहे. कोवाड परिसरातील मंडळांना परवानगीसाठी चंदगडला येणे खर्चिक असल्यामुळे परवानगी मागणीचे अर्ज कोवाड येथेच जमा करण्याची सुविधा देण्यात येईल. असे सांगताना चंदगड पोलीस स्टेशन मार्फत तालुकास्तरीय क्रीडा व बौद्धिक स्पर्धा आयोजित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

     बैठकीस कोवाड पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या माणगाव, निट्टूर, कोवाड, कालकुंद्री, कुदनूर, तळगुळी, राजगोळी पासून चन्नेहट्टी पर्यंतच्या साठ गावातील मंडळांचे कार्यकर्ते व पोलीस पाटील उपस्थित होते. श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment