श्रीकांत सुबराव पाटील यांना 'गुरुवंदना जीवनगौरव सन्मान' पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

29 August 2023

श्रीकांत सुबराव पाटील यांना 'गुरुवंदना जीवनगौरव सन्मान' पुरस्कार जाहीर

 

श्रीकांत सुबराव पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       विद्या मंदिर जक्कनहट्टी, (सध्या कामगिरी विद्यामंदिर शिवणगे) ता. चंदगड येथील शिक्षक श्रीकांत सुबराव पाटील  (मुळ गाव - म्हाळेवाडी, ता. चंदगड) यांना गोवा हिंदी अकादमी गोवा व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'गुरुवंदना जीवन गौरव सन्मान' पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला ३ सप्टेंबर २०२३ रोजी ११ वाजता शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित 'गुरुवंदना राष्ट्र भूषण संमेलन २०२३' कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 

       मेहनत, सचोटी व चांगुलपणा ही जीवनातील तत्त्व सांभाळून केलेल्या शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

      आपल्या एकूण सेवेपैकी १७ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील  दुर्गम भागात व उर्वरीत २० वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात मलतवाडी, चिंचणे व जक्कनहट्टी या  डोंगराळ व दुर्गम गावात बजावली आहे. या काळात उदात्त भावनेतून सुसंस्कृत व आदर्श विद्यार्थी घडवले. स्वतः उत्कृष्ट हॉलीबॉल व गोळा फेक खेळाडू असल्याने विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक मार्गदर्शन करण्याबरोबरच सार्वत्रिक निवडणूक, जनगणना, केंद्रस्तरीय मतदान अधिकारी अशा राष्ट्रीय कार्यात सहभाग, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अभियान, तंबाखू मुक्त शाळा व सहशालेय उपक्रमात अग्रेसर राहून कार्य केले आहे. या सर्व कार्याची दखल पुरस्काराच्या निमित्ताने संस्थेने घेतली आहे. या कामी त्यांना कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील, केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment