महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्गानंतर आता साकारणार देशातील सर्वात लांब शक्तिपीठ महामार्ग !, नागपूर ते गोवा प्रवास फक्त ८ तासात, कोल्हापूर जिल्ह्यातील जाणार महामार्ग - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2023

महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्गानंतर आता साकारणार देशातील सर्वात लांब शक्तिपीठ महामार्ग !, नागपूर ते गोवा प्रवास फक्त ८ तासात, कोल्हापूर जिल्ह्यातील जाणार महामार्ग

संग्रहित छायाचित्र

तेऊरवाडी / एस. के. पाटील 

        महाराष्ट्र सरकारने समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ एक्सप्रेसवेची घोषणा केली. नागपूर आणि गोवा यांना जोडण्यासाठी या एक्स्प्रेसवेमुळे या दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ २१ तासांवरून ८ तासांवर येईल, असे सांगितले जात आहे. या एक्स्प्रेसवेला शक्तीपीठ एक्सप्रेसवे असे नाव देण्यात आले आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग व कोकण  जोडले जाणार आहेत, गोव्यापर्यंत हा एक्सप्रेसवे असणार आहे.

     या एक्सप्रेसवेमुळे महाराष्ट्रातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडील ३ शक्तीपीठे, २ ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे जोडली जातील. यामुळे नागपूर ते गोवा दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे १० तासांनी कमी होईल. सुमारे ७६० किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेसवेची लांबी नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेपेक्षा जास्त असेल.

         राज्याच्या, प्रदेशाच्या आणि देशाच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातात. दरम्यान, याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यातील विविध जिल्ह्यांना एकमेकांना जोडण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे केली जात आहेत.

        याचाच एक भाग म्हणून राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. या मार्गाचे 701 किलोमीटर पैकी 600 किलोमीटरचे काम पूर्ण देखील झाले आहे. विशेष बाब अशी की हा 600 किलोमीटरचा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. या मार्गावर अपघात घडत असले तरी ते रोखता येऊ शकतात . उपराजधानी नागपूर ते भरवीर पर्यंतचा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे. उर्वरित शंभर किलोमीटरचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असून या वर्षाअखेर किंवा पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून नागपूर ते गोव्यादरम्यान नवीन शक्तिपीठ महामार्ग विकसित केला जाणार आहे. विशेष बाब अशी की या दोन्ही शहरांना जोडणारा हा मार्ग देशातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. हा मार्ग समृद्धी महामार्गापेक्षा जवळपास 60 किलोमीटर अधिक लांबीचा राहणार आहे. हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून आणि कागल, भुदरगड, राधानगरी तालुक्यातून जाणार आहे.

       या मार्गाची एकूण लांबी 760 किलोमीटर राहणार असून हा मार्ग राज्यातील 11 जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चार विभागाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा मार्ग राहणार आहे. हा मार्ग राज्यातील सर्व महत्त्वाची तीर्थक्षेत्रे एकमेकांना कनेक्ट करण्याचे काम करणार आहे. राज्यातील तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई आणि माहूरच्या देवीचे शक्तीपीठ अशी एकूण तीन शक्तीपीठ दोन ज्योतिर्लिंग जोडणार आहे. यामुळे या मार्गाला शक्तिपीठ महामार्ग असं नाव देण्यात आले आहे. एकंदरीत या मार्गामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

           महामार्गाची वैशिष्ट्ये 

         या 760 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास मात्र 8 तासात पूर्ण होणार आहे. सध्या हा प्रवास करण्यासाठी 21 तासांचा कालावधी लागतो. याचा अर्थ प्रवासात तब्बल 13 तासांची बचत होणार आहे. यासाठी जवळपास 75 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार असून 2028 किंवा 2029 पर्यंत हा मार्ग बांधून तयार होणार आहे.

        हा मार्ग सेवा ग्राम, कारंजा लाड, माहूर, औंढा नागनाथ, तख्त सचखंड गुरुद्वारा नांदेड, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, लातूर, उस्मानाबाद, अंबाबाई कोल्हापूर, भुदरगड तालुक्यातील संत बाळूमामा आदमापूर, कुणकेश्वर, पत्रा देवी यांसारख्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना जोडण्याचे काम करणार. कोल्हापूरकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

No comments:

Post a Comment