चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सामाजिक बांधिलकी व पारिवारिक सलोखा जपण्याचे कार्य रक्षाबंधनातून सफल होते असे मत चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी व्यक्त केले. चंदगड र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित 'रक्षाबंधन' कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, "भारतीय संस्कृतीचा परंपरा हा एक भाग आहे. रक्षाबंधन ही अशीच एक परंपरा आहे. सर्वत्र रक्षाबंधनाद्वारे बहीण-भावाच्या पवित्र नात्याची आठवण करून दिली जाते. बहीण भावाला राखी बांधून भावाच्या उज्वल भवितव्याची व सुखी जीवनाची अपेक्षा व्यक्त करते व भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. सामाजिक सलोखा व पारिवारिक संबंधांना दुजोरा देणारा हा एक पवित्र उत्सव आहे. समाजातील व्यक्तींनी या उत्सवाच्या माध्यमातून आपले प्रेमाचे, बंधुत्वाचे व जिव्हाळ्याचे संबंध कायम टिकवावेत आणि समाजात शांततेने व प्रेमाने राहावे, आम्ही पोलीस बांधव नेहमी आपल्या सोबतीला आहोत. अशा शांतताप्रीय समाजाला कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची वेळच येणार नाही. आपण बांधलेला हा राखिचा पवित्र धागा आम्हाला समाजाच्या रक्षणाची नेहमी आठवण करून देत राहिल."
स्वयंसेवकांनी सर्व पोलिस बांधवांना राखी बांधून बहिण-भावाच्या पवित्र नात्याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प अधिकारी व कोल्हापूर जिल्हा समन्वयक डाॅ. संजय पाटील यांनी केले व कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.
यावेळी प्रा. आर. एस. पाटील, प्रा. व्हि. के. गावडे, डाॅ. एस. डी. गावडे, डाॅ. आर. ए. कमलाकर, डाॅ. एन. के. पाटील इंदुताई कांबळे, आकांक्षा कांबळे, सर्व स्वयंसेवक, चंदगड पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस मित्र उपस्थित होते.
No comments:
Post a Comment