स्वातंत्र्यसैनिक व शहीद जवानांच्या वारसांना कृतज्ञता संदेश....! कोणी राबविला उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2023

स्वातंत्र्यसैनिक व शहीद जवानांच्या वारसांना कृतज्ञता संदेश....! कोणी राबविला उपक्रम

उंबरवाडी येथील शहीद जवान जोतिबा चौगुले यांचे वीरपिता गणपती चौगुले यांना कृतज्ञता पत्र देताना तानाजी कुरळे, सोबत पोलीस पाटील सौ विनया सावंत, तलाठी राजश्री पचंडी व ग्रामस्थ.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
  चन्नेकुपी (ता. गडहिंग्लज) चे पोलीस पाटील तानाजी कुरळे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपुर्तिनिमित्त स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे वारस तसेच शहीद जवानांच्या वारसांना कृतज्ञता संदेश पत्रांचे वाटप करण्याचा उपक्रम राबवला आहे.  ७५ वारसांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी जात ही पत्रे देऊन स्वातंत्र्य सेनानी व शहीद जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. राज्यातील पोलीस पाटलांच्या उद्बोधनासाठी  राज्यभर फिरून त्यांना मार्गदर्शन करणारे पोलीस पाटील म्हणून तानाजी रामचंद्र कुरळे सर्व परिचित आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात त्यांनी स्वखर्चाने जाऊन पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले आहे.
शहीद जवान सुनील जोशिलकर लिंगनूर यांच्या वीरपत्नी संध्या यांना कृतज्ञता पत्र देताना तानाजी कुरळे सोबत बसगोंडा पाटील.

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पुर्तिनिमित्त त्यांनी राबवलेल्या या आगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुत्नाळ (ता.गडहिगलज), मुरगुड, नानीबाई चिखली, सेनापती कापशी (ता.कागल) त्याचबरोबर चंदगड व आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील ६ हुतात्मे, ४४ स्वातंत्र्य सैनिक व २५ शहीद जवान अशा ७५ घरी कृतज्ञतापूर्वक भेट देऊन त्यांच्या स्मृतीस संदेश पत्राद्वारे अभिवादन केले. यात शहीद पोलीस अधिकारी संजय चंद्रसेन चौगुले- चन्नेकुपी, सुनील जोशीलकर- लिंगनूर, दिलीप ज्योतिबा रेडेकर- बटकणंगले, ज्योतिबा गणपती चौगुले- उंबरवाडी, हुतात्मा शंकरराव इंगळे- सेनापती कापशी, हुतात्मा बिंदू नारायण कुलकर्णी- मुत्नाळ, हुतात्मा बस्तू बाबू बारदेस्कर- मुरगुड, जोतिबा चौगुले- उंबरवाडी  आदींचा समावेश आहे.
     स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्यवीरांनी जोपासलेली मुल्ये पुढील पिढीमध्ये रुजविणे व त्यांचा प्रचार करणे हा या उपक्रमागील हेतू असल्याचे तानाजी कुरळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment