जनता विद्यालय तुर्केवाडी येथे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरण पूरक शाडूच्या गणेश मुर्त्या |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय तुर्केवाडी (ता. चंदगड) च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी शाडूच्या मूर्ती साकारून पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शाडूच्या गणेश मूर्तींच्या दालनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव जी एन पाटील यांच्या हस्ते झाले.
यावर्षी इयत्ता ६ वी व ७ वीच्या विद्यार्थ्यांना कला विषयांतर्गत पूर्वकल्पना देऊन शाडूच्या मूर्ती साकारण्याचे आवाहन करण्यात आले होते. आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी कल्पकता जोपासत विविध आकारातील शाडूच्या मूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या मूर्ती साध्या, सोप्या आणि कल्पक आहेत. विद्यार्थ्यांचा कलात्मक दृष्टिकोन या सर्व प्रयत्नातून दिसून आला. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपले सण उत्सव पर्यावरण पूरक असले पाहिजे याची जाणीव या उपक्रमातून विद्यार्थ्यांना करुन देण्यात आली. शिवाय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावही देता आला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांनी जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते ते रोखण्यासाठी पर्यावरण पूरक शाडूच्या मूर्ती साकारणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्या आकर्षक कलाकृतींना पारितोषिके देण्यात आली. या मुर्तीकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. सोनाली संजय दळवी, द्वितीय क्रमांक कु. प्राजक्ता राजू बिजगर्णिकर, तृतीय क्रमांक कु. साईनाथ देवाप्पा पाटील तर उत्तेजनार्थ कु. अबुबकर सुभान शेख या विद्यार्थ्यांनी पटकावले. विद्यार्थ्यांनी साकारलेले या मुर्त्यांचे शाळेत प्रदर्शन भरून इतर विद्यार्थ्यांनाही या कलाकृती पाहता आल्या. चांगल्या पर्यावरणासाठी पुढील काळात इतर विद्यार्थीही अशा पद्धतीच्या कलाकृती साकारू शकतील यासाठी केलेल्या या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळाला. शाळेचे कलाशिक्षक एस. डी. गावडे यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक पी. एन. यळ्ळुरकर, पर्यवेक्षक एस. ए. पाटील, ज्येष्ठ शिक्षक ए. के. नाईक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment