न्यायालयीन समितीकडून चंदगड तालुक्यातील शाळांची अचानक तपासणी, वाचा.... कोणत्या शाळांची झाली तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 September 2023

न्यायालयीन समितीकडून चंदगड तालुक्यातील शाळांची अचानक तपासणी, वाचा.... कोणत्या शाळांची झाली तपासणी

मराठी विद्या मंदिर कागणी येथे तपासणी प्रसंगी न्यायाधीश देशमुख यांच्यासह अधिकारी व शिक्षक

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
      उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्यातील शाळांमधील वर्ग, परिसर स्वच्छता व भौतिक सुविधा अद्यावत आहेत का? याची पाहणी करण्यासाठी जिल्हावार न्यायालयीन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील शाळांची कोणतीही पूर्व सूचना न देता काल दि १ सप्टेंबर २०२३ रोजी अचानक तपासणी करण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश ओमकार देशमुख, गडहिंग्लजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे व सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड चे उपअभियंता इफ्तेकार मुल्ला आदी अधिकाऱ्यांनी  शाळा व परिसराची पाहणी केली.
   केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड शाळेपासून तपासणीची सुरुवात केल्यानंतर पथकाने भागातील जिल्हा परिषदेच्या कागणी, कालकुंद्री, कुमार व कन्या विद्यामंदिर कुदनूर, तळगुळी, दिंडलकोप, राजगोळी बुद्रुक, राजगोळी खुर्द, चन्नेहट्टी, यर्तेनहट्टी या ११ शाळांची पाहणी केली. प्रत्येक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी न्यायाधीश देशमुख यांनी संवाद साधून समस्या जाणून घेण्यासह विद्यार्थी उपस्थिती व अभ्यासातील प्रगतीची चाचपणी केली. शालेय परिसर, स्वच्छतागृहे यातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. अनेक शाळांमध्ये शालेय परिसर बंदिस्त करण्यासाठी संरक्षण भिंत, गेट, विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अपुरी असलेली शौचालये व मुताऱ्या यांची नोंद घेतली. कमिटीने शालेय भौतिक सुविधा, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, खेळाचे मैदान, कंपाऊंड, शालेय  इमारत  योग्य  आहे की नाही, शाळेतील पिण्याच्या पाण्याची स्थिती, शाळेच्या परिसरात काही गैरप्रकार घडतात का, शाळेला कंपाऊंड भिंत आहे का? आदीबाबत या समितीने पाहणी केली. याबाबतचा अहवाल वरिष्ठ न्यायालयाकडे सादर केला जाणार आहे.
 ओ. आर. देशमुख (जिल्हा सत्र न्यायाधीश गडहिंग्लज)  प्रशांत थोरात (नायब तहसीलदार गडहिंग्लज), रोहित दिवसे (पोलीस निरीक्षक गडहिंग्लज), सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) उपअभियंता ए व्ही भोसले (गडहिंग्लज), आर एन सावंत (आजरा), इफ्तेकार मुल्ला (चंदगड), डी एस मिरजकर (भुदरगड),   एन. बी. हलबागोळ (गटशिक्षणाधिकारी गडहिंग्लज) आदींचा समावेश असलेल्या पथकामार्फत गडहिंग्लज उपविभागातील प्रत्येक तालुक्यातील दहा टक्के शाळांची तपासणी होणार आहे. यात चंदगड तालुक्यातील २८६ पैकी २९, आजरा १८६ पैकी १७, गडहिंग्लज २३६ पैकी २४, भुदरगड २३० पैकी २३ शाळांची तपासणी होणार आहे.


No comments:

Post a Comment