चंदगडमध्ये भ्रष्ट अधिकारी पाठवू नका...! नवीन आगार व्यवस्थापक नेमणूक प्रश्नी निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2023

चंदगडमध्ये भ्रष्ट अधिकारी पाठवू नका...! नवीन आगार व्यवस्थापक नेमणूक प्रश्नी निवेदन

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा    
  राज्यातील अनेक जिल्ह्यात व तालुक्यात भ्रष्ट व लाचखोर म्हणून चर्चेत आलेले अधिकारी चंदगड येथे नेमणूक देऊन खपवण्याचे प्रकार यापूर्वी अनेक वेळा घडले आहेत. तसाच काहीसा प्रकार चंदगड एसटी आगार व्यवस्थापक पदी नवीन नेमणूक दिलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबत घडताना दिसत आहे. 
    फलटण एसटी आगाराच्या व्यवस्थापक वासंती जगदाळे यांच्यावर तिकडे गैरकारभाराचा आरोप झाल्यानंतर त्यांची बदली चंदगड येथे झाली आहे. तथापि येथील जागरूक नागरिकांना याबद्दलची माहिती समजताच त्यांची चंदगड येथे होणारी बदली तात्काळ थांबवावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक चंदगड तसेच राज्य परिवहन महामंडळाला दिले आहे.   
    वासंती जगदाळे यांच्या फलटण येथील कार्यकाळात त्यांच्यावर अष्टविनायक यात्रा व अन्य बाबतीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. यापूर्वीही चंदगड तालुक्यातील जनतेच्या अज्ञान व लाचखोर अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याच्या मानसिकतेचा फायदा घेत लाचखोर, भ्रष्ट व निलंबित अधिकाऱ्यांना इकडे पाठवण्याचे प्रकार घडले आहेत. तथापि आता तसे होऊ देणार नसल्याचे नितीन फाटक, संघर्ष प्रज्ञावंत, विश्वनाथ देवणे, शुभम पेडणेकर, रामचंद्र गावडे, गोविंद गोवेकर, विजय गावडे, विनोद गावडे रोहन भोंगाळे आदींनी निवेदनातून स्पष्ट केले आहे. ही बदली न थांबवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 
   या निवेदनानंतर आगार व्यवस्थापक जगदाळे यांची बदली थांबते का! याची उत्सुकता चंदगड तालुक्यातील प्रवासी वर्गाला लागली आहे.


No comments:

Post a Comment