शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै. मारूती नाईक यांचे निधन, १९८३-८४ साली मिळाला होता पुरस्कार, निट्टूर ग्रामपंचायतीमार्फत विधवा प्रथा बंद - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2023

शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै. मारूती नाईक यांचे निधन, १९८३-८४ साली मिळाला होता पुरस्कार, निट्टूर ग्रामपंचायतीमार्फत विधवा प्रथा बंद

मारूती गणेश नाईक

नंदकुमार ढेरे / चंदगड - प्रतिनिधी 

    कुस्ती खेळातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै. मारूती गणेश नाईक (वय वर्ष ७३) यांचे आज अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. निट्टूर येथील स्मशानभूमीत दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सकाळी ग्रामस्थांनी कै. मारुती नाईक यांच्या पार्थिवाची  सजवलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीतुन वारकरी मंडळाचे भजन व लेझीम पथकासह मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावांसह चंदगड तालुक्यातील कुस्ती क्षेत्रातील पैलवान यावेळी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. 

                                    

      पै. मारूती नाईक यांना १९८३-८४ साली पुणे येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र शासनामार्फत त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदाची नोकरी देण्यात आली होती, पण स्वता अल्पशिक्षित असल्यामुळे ती नोकरी त्यांनी प्रामाणिक पणे नाकारली होती. स्मशानभूमीत माजीमंत्री भरमुआण्णा पाटील, दौलतचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, शिक्षक समितीचे नेते शंकरराव मनवाडकर, पैलवान विनायक पाटील आदीनी यावेळी श्रध्दांजली वाहिली. 

श्री गणेश प्राथमिक विद्यामंदिर निट्टूर येथे तत्कालीन मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पैलवान मारुती नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान घडवून आणला होता. त्याचे संग्रहित छायाचित्र.
                             

    स्मशानभूमीत पै. नाईक यांच्यावर अत्यसंस्कार करण्यापूर्वी आज पासून ग्रामपंचायतीमार्फत विधवा प्रथा बंद करत असल्याचे जाहीर करून शासनाच्या विधवा प्रथा बंद आदेशाची अंमलबजावणी आज पासून करत असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने घनश्याम पाटील यांनी जाहीर केले. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला कै. नाईक याच्या कुटुंबियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पै. नाईक यांच्या पत्नी भागूबाई यांचे कुंकू न पुसता व बांगड्या न फोडता प्रतिसाद दिला.

      पै. मारूती नाईक यांचा परिचय 

      निट्टूर गावचे रहिवासी असणारे शरीर यष्टीने अतिशय किरकोळ वाटणारे पण कुस्तीच्या आखाड्यात मोठमोठ्या पैलवानांना घाम फोडणारे चित्याच्या चपळाईने समोरच्याला चितपट करणारे पैलवान म्हणून त्यांची ख्याती होती. अतिशय गरीब कुटुंबात मारूती नाईक यांचा जन्म १९५० साली झाला. त्यांना चार भाऊ, चार बहीणी होत्या. मारुती नाईक हे दोन नंबरचे अपत्य, घरची परिस्थिती बेताचीच असलेने उदरनिर्वाहासाठी त्यांनी मुंबई गाठली. त्यावेळी मुंबईमध्ये  राहण्यासाठी त्यांनी कोल्हापूर व्यायाम शाळा इथेच वास्तव्य केले. याच ठिकाणी कुस्तीच्या आखाड्यात कुस्तीचे धडे गिरवले. त्यावेळी फक्त मिलमध्येच रोजगार मिळायचा त्यावेळी मिलकामगार ही मोठ्या प्रमाणात असल्याने बदली कामगार म्हणूनच काम करावे लागे. दररोज तिन्ही शिफ्टला वेळेवर मिलच्या गेटवर उभे रहायचे आणि कोणी पर्मनंट कामगार गैरहजर राहिला तरच रोजगार मिळायचा. अशा परिस्थितीत दिवस काढत मोरारजी मिलमध्येच ते कुस्ती खेळाडू म्हणूनच पर्मनंट झाले. आपले स्वतःचे व तीन लहान भाऊ व चार बहिणी यांची लग्नाची जबाबदारी पण त्यांनीच पार पाडली व त्यांचे सुखी संसार करून दिले. त्याकाळात मोरारजी मिलचे नांव कुस्ती क्षेत्रात मुंबईच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यांचा कुस्तीच्या खेळातील दबदबा पाहून त्यांना रेल्वे व मुंबईच्या इतर मिलकडून मोठ्या पगाराची अमिष दाखविले जायचे, पण हे व्यक्तिमत्त्वच वेगळं व अतिशय प्रामाणिक होत. मित्र परीवार व पै पाहूणे यांचेकडून सांगितले जायचे पण हे नेहमी सांगत खाल्या मिठाला जागलं पाहिजे असचं उत्तर त्यांचं असायचं. आई वडीलांच्या मृत्युनंतर सर्व भाऊ विभक्त झाले. मोरारजी मिल मधील निवृत्ती नंतर ते गावीच वास्तव्यास होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्यावर फारच हालाखीची परिस्थिती ओढवली. मिलची मिळणा-या तुटपुंज्या निवृत्ती वेतनासाठी पण त्यांना फार हेलपाटे मारावे लागले, मंजूर निवृत्ती वेतन ही अतिशय अल्प प्रमाणात होते. उदरनिर्वाहासाठी त्यांनी उसाच्या फडात ही ऊसतोडणी कामगार म्हणून काम केले. कोरोना काळात त्यांना अर्धांग वायूचा अघात झाला व शरीराची एक बाजू निकामी झाली. बेळगांव व कोल्हापूर येथील ब-याच हाॅस्पिटलमध्ये त्यांचेवर उपचार करण्यात आले पण वयोमानानुसार शरीर साथ देत नसलेने गेली दोन अडीच वर्ष ते अंथरूणाला खिळून होते. अखेर आज शनिवार दि.२३ रोजी पहाटे पाच वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित भाऊ, चार विवाहित बहिणी, भावजय, पुतणे असा त्यांचा परिवार आहे. चंदगडचे नाव कुस्ती क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या अशा गुणी खेळाडूस चंदगड पत्रकार संघ संचलित 'सी एल न्यूज' कडून भावपूर्ण श्रद्धांजली...!

                          

No comments:

Post a Comment