सापाला पकडल्यानंतर सर्पमित्र विनोद कांबळे यांनी गावातील शेतकरी मारुती माडूळकर यांच्या गळ्यात सापाला घालून त्यांची सापाबद्दलची भीती नाहीशी केली. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील विश्वभुवन हॉटेलमध्ये साप घुसल्यामुळे मालक व ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. साप विषारी की बिनविषारी हे माहीत नसल्यामुळे सुरुवातीस हा विषारी मन्यार असे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.
त्यानंतर कोणीतरी कागणी येथील सर्पमित्र विनोद कांबळे यांना फोन करून याबाबत माहिती दिली. ते काही वेळातच विश्वभुवन हॉटेलमध्ये दाखल झाले. मोठाला उंदीर खाऊन सुस्तावलेल्या या सापाला विनोद यांनी शिताफीने पकडले. सापाला पकडून बाहेर आणल्यानंतर तो टस्कर या बिनविषारी जातीचा असल्याचे सर्पमित्र विनोद यांनी सांगताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. कालकुंद्री एसटी स्टँड या मुख्य चौकातच घटना घडल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी जमली होती.
गर्दीतील बरेच जण सापाला मारून टाका! मारून टाका! असे सांगत होते. मात्र सर्पमित्र कांबळे यांनी "साप हा आपला मित्र आहे. तो आपल्या पिकांची व अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांना खाऊन आपली मदतच करतो." असे प्रबोधन केले. तस्कर साप बिनविषारी असल्याने तो चावला तरी काही धोका होत नाही. असे सांगत गर्दीतील मारुती माडगूळकर या शेतकऱ्याच्या गळ्यात सापाला अडकवून त्यांच्यातील सापाबद्दलची भीती नाहीशी केली.
सर्पमित्र कांबळे यांनी आत्तापर्यंत मनुष्यवस्तीत गेलेल्या विविध जातीच्या ५१२ सापांना जीवदान दिले आहे. ते वर्ल्ड फॉर नेचर संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्यासोबत आलेले त्यांचे मित्र रोशन कांबळे यांनी त्यांना याकामी सहकार्य केले. यावेळी गावातील सेवा सोसायटी चेअरमन अशोक पाटील, कालकुंद्री येथील सर्पमित्र प्रकाश लोहार आदींची उपस्थिती होती. हा साप गेले काही दिवस हॉटेलच्या परिसरात वावरत असल्याचे हॉटेल मालक यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment