तुडिये सब स्टेशनला भारनियमनामुळे ग्रामस्थांकडून टाळे, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंधारात पार पडली भारनियमनाची बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2023

तुडिये सब स्टेशनला भारनियमनामुळे ग्रामस्थांकडून टाळे, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंधारात पार पडली भारनियमनाची बैठक

तुडिये / सी. एल. वृत्तसेवा

          महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून तुडिये फिडरवरून गेल्या काही दिवसापासून अन्यायकारी भारनियमन करण्यात येत आहे. याबाबत तुडिये ग्रामपंचायतीने चंदगड येथील महावितरण कार्यालयात निवेदन दिले होते. परंतु महावितरण कडून भारनियमन चालूच होते. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून  सरपंच विलास सुतार यांनी गुरुवारी (ता. ३१)  रात्री ८.३० वाजता  तुडिये सब स्टेशनलाच टाळे टोकले. 

         टाळे  लावताच महावितरणचे चंदगड मधील कार्यकारी अभियंता श्री. लोधी हे तुडिये  गावात पोहचले. महालक्ष्मी मंदिर येथे तातडीचे बैठक बोलावण्यात आली. चंदगड  पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत  रात्री साडे दहाच्या सुमारास अंधारातच महावितरण व ग्रामस्थांमध्ये भारनियमना बाबत बैठक झाली. बैठकीला तुडिये परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.  

        बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसस्कोप जलाशयासाठी व तिलारी जलविद्युत प्रकल्पसाठी येथील शेतकऱ्यांना आपल्या सुपीक जमिनीचा त्याग केला आहे. तिलारी विद्युत प्रकल्पामुळे संपूर्ण गोवा राज्य प्रकाशमान झाले. मात्र येथील प्रकल्पग्रस्त मात्र महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे सतत अंधारात चाचपडत असतात. महावितरणच्या सब स्टेशन करिता तुडिये ग्रामपंचायतीने विनामोबदला जागा दिली आहे. त्यावेळी झालेल्या लेखी करारानुसार  महावितरण कडून तुडिये फिडरवरून विनाखंडीत  वीज  पुरवठा करण्याचे मान्य करण्यात आले होते. परंतु तालुक्यातील इतर फिडर सोडून केवळ कमी विद्युत भार असलेल्या तुडिये फिडर वरूनच भारनियमन केले जाते असा सवाल सरपंच विलास सुतार  यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यां समोर उपस्थित केला. 

       तुडिये परिसरातील बहुतांश लोक वाडी वस्तीवर राहतात. रात्रीच्या वेळीच भार नियमन केले जात असल्याने, शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या रास्त असल्याचे सांगत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठांकडे पाठ पुरावा करण्याचे आश्वासन दिले. आश्वासनानंतर रात्री उशिरा सब स्टेशनचे टाळे काढून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

No comments:

Post a Comment