चांद्रयान 3 मोहिमेचे यश आत्मनिर्भर भारताला अभिमानास्पद - विष्णुपंत मिसाळे, माडखोलकर महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2023

चांद्रयान 3 मोहिमेचे यश आत्मनिर्भर भारताला अभिमानास्पद - विष्णुपंत मिसाळे, माडखोलकर महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा

 

                                               ज्येष्ठ शास्त्रज्ञ मा विष्णुपंत मिसाळे बोलताना

 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चांद्रयान तीन मोहिमेचे यश समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. अवकाश विज्ञान क्षेत्रात भारताच्या या कामगिरीची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे.  भारतीय अवकाश विज्ञान संस्था( इस्रो) च्या शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम करून ही मोहीम  यशस्वी केली. प्रशान रोव्हरच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती मिळविली जात आहे. हे यान पाच ते सहा महिने चंद्रावरती परिक्रमा करेल आणि मिळालेली माहिती संकलित स्वरूपात पाठवेल. मृदा, पाणी, वातावरण, खनिज संपत्ती याबाबत तपशील मिळेल आणि या माहितीचा उपयोग निश्चितच उज्वल भवितव्यासाठी उपयुक्त ठरेल." असा विश्वास इस्रोचे शास्त्रज्ञ मा. विष्णुपंत मिसाळे यांनी व्यक्त केला. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील  भूगोल व पदार्थविज्ञान विभागाने आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते.

    ते पुढे म्हणाले' ``चंद्राच्या पृष्ठभागावरील माती, खडकातील रासायनिक संयुगे यांचीही  माहिती उपलब्ध होईल .ही मोहीम भारताच्या चंद्र संशोधन कार्यक्रमातील महत्त्वपूर्ण मोहीम असून त्यामुळे भारताच्या अंतराळ संशोधनाची क्षमता जगाच्या लक्षात येईल . घन, तरल व क्रायोजेनिक  अशा तीन प्रकारच्या उपकरणाद्वारे या संशोधनास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचे बारकावे समजून घ्यावेत व या क्षेत्रात अधिक संशोधन करावे. विज्ञानाला योगदान देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यावेळी या मोहिमेचा रोचक इतिहास त्यांनी सविस्तर विशद केला व नजीकच्या भविष्यात भारत सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सूर्ययान पाठवण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले.``

        अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य पाटील यांनी `विद्यार्थ्यांना चांद्रयान तीन मोहिमेची सविस्तर माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमातून प्रेरणा घ्यावी व त्यांची संशोधन वृत्ती वाढीला लागावी हा महत्त्वाचा हेतू असल्याचे सांगितले.`

      प्रा. एन. एस. पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. एन. एस. मासाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. एम. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला एल. डी. कांबळे, विजयकुमार दळवी, नारायण गडकरी, निंगाप्पा बोकडे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती होती. 

                      विद्यार्थ्यांनी अल्पसंतुष्ट राहू नये 

         प्राचीन गुरुकुल पद्धतीत शिष्य कसोटीला उतरल्यावरच त्याला पुढचे शिक्षण दिले जायचे. दुर्दैवाने आपली शिक्षण प्रणाली बंद पडली. खरे शिक्षक व खरे शिक्षण यापासून विद्यार्थ्यांचीफारकत झाली. ज्या ला कर्तृत्व सिद्ध करायचे आहे त्याने आपल्या गौरवशाली परंपरांच्या विषयी आदरभाव बाळगून त्या जतन केल्या पाहिजेत तसेच विद्यार्थ्यांनी कोणतेही काम पूर्ण क्षमतेने केले पाहिजे अशी अपेक्षा विष्णुपंत मिसाळे व्यक्त केली.

No comments:

Post a Comment