आगामी निवडणुकांमध्ये आमचे कार्यकर्ते ताकद दाखवतील...! माजी आम. राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2025

आगामी निवडणुकांमध्ये आमचे कार्यकर्ते ताकद दाखवतील...! माजी आम. राजेश पाटील

  

कुदनूर येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना माजी आमदार राजेश पाटील

कुदनूर : सी एल वृत्तसेवा 

        उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,  जिल्ह्याचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांचे खंबीर पाठबळ असल्यामुळे चंदगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी येणार आहे. आगामी ग्रामपंचायत,. जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांमध्ये माझे कार्यकर्ते आपली ताकद दाखवून देतील यात शंका नाही. असे प्रतिपादन माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी केले. ते कुदनूर ता. चंदगड येथे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 

      स्वागत व प्रास्ताविक सुखदेव शहापूरकर यांनी केले. यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले राजकारणात वेगळ्या प्रवृत्तीचे लोक घुसल्यामुळे राजकारणात निकोप स्पर्धा राहिलेली नाही. येत्या काळात आपल्या पक्षात नवीन तरुण युवकांना सामील करून घेऊन त्यांना संधी दिली जाईल. आगामी निवडणुका महत्त्वाच्या असल्याने कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना प्रा. सुखदेव शहापूरकर म्हणाले विधानसभा निवडणूक होऊन दहा महिने झाले असले तरी अजूनही राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांची उद्घाटने सुरू आहेत. यावरून त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो. त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सोळाशे कोटींचा निधी आणून महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील अनेक रस्ते केले केल्याचे सांगितले.

      यावेळी दत्तू मिलके, अशोक पाटील, जे. एस. पाटील, मारुती लांडे, वसंत जोशीलकर, लक्ष्मण पाटील, दयानंद सलाम, गुलाब पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. गणपतराव पाटील (दुंडगे), दत्तू पवार (कुदनुर), बाळू मनमाडकर व यल्लाप्पा जरळी (दिंडलकोप) आदींनी पुढील काळात राजेश पाटील यांच्या गटाला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी अशोक गवंडी, एस. एल. पाटील, पोमाणा पाटील, विनोद पाटील, भरमा जोशीलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पी. बी. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment