सरकारी शाळांचे खाजगीकरण व कंत्राटी नोकर भरतीचा डाव हाणून पाडणार...! शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2023

सरकारी शाळांचे खाजगीकरण व कंत्राटी नोकर भरतीचा डाव हाणून पाडणार...! शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे निवेदन

 

तहसिलदारांना निवेदन देताना शिवसेनेचे कार्यकर्ते.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    सरकारने नुकत्याच काढलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय व निमशासकीय नोकर भरती यापुढे खाजगीकरण व कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कंत्राटी कंपन्या मनमानी कारभार करतील व कर्मचाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची कंत्राटी किंवा खाजगी पद्धतीने भरती करणे ही बाब शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही. एकीकडे सरकारने पवित्र पोर्टल च्या माध्यमातून शिक्षक भरती करणार असल्याचे घोषित केले आहे. तर दुसरीकडे कंत्राटी पद्धतीने भरती सुरू आहे. हा विरोधाभास जाणवतो.

        सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार ५० लाख ते २ कोटी रुपये दिल्यास सरकारी शाळेला देणगीदाराचे नाव पाच वर्षांसाठी देण्याचा घाट शासनाने घातला आहे. यात इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, देखभाल दुरुस्ती व गुणवत्ता सुधारण्यासाठी उपक्रम सुचवायचे गाजर दाखवले जात आहे. 

        एकीकडे शिक्षणावरील खर्च ६ टक्के करण्याची गरज असताना तो ३ टक्के पेक्षा कमी करून खाजगीकरणावर भर देणे ही बाब निषेधार्ह आहे. शाळा दत्तक देण्यासाठी राज्य, महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद पातळीवर समित्या स्थापनेत येत आहेत. देणगीदारांकडून प्रस्ताव मागून समित्या शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते. असे झाले तर नक्की शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा डाव साधला जाईल. 

       राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील नियमित शिक्षक भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षकांची दरमहा २० हजार रुपये मानधनावर नियुक्ती करण्याबाबत आदेश काढून काही शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक रुजू करून घेतले आहेत. याला शिवसेनेचा विरोध आहे. शैक्षणिक पात्रता धारक तरुण उपलब्ध असताना सेवानिवृत्त शिक्षक नेमणे म्हणजे सेवानिवृत्ती वयाच्या धोरणाला छेद देण्याचा प्रकार आहे. यातून बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांची भरती रद्द करून पात्र बेरोजगारांना नोकरीची संधी द्यावी.

        शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शासकीय व निमशासकीय नोकर भरती खाजगीकरण व कंत्राटीकरण पद्धतीने भरणे,  सरकारी शाळांचे खाजगीकरण, सेवानिवृत्त शिक्षकांची पुनर्नियुक्ती याला प्रखर विरोध करीत आहे.  पुरोगामी महाराष्ट्राला लाभलेली शिक्षणाची परंपरा खंडित करण्याचा विद्यमान सरकारचा कुटील डाव शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष  हाणून पाडण्यासाठी जन आंदोलन उभा करेल. याची गंभीर नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन चंदगड तहसीलदार यांना दि. २५/०९/२०२३ रोजी देण्यात आले आहे. निवेदनावर शिवसेना चंदगड तालुका प्रमुख अनिल दळवी व लक्ष्मण मनवाडकर, युवा सेना प्रमुख विक्रम मुतकेकर, तालुकाप्रमुख उदय मंडलिक, यल्लाप्पा मजकेकर, गणेश बागडी, नितीन सुतार, अवधूत बागडी, भुजबळ मोनाप्पा चौगुले, एकनाथ संदीप गावडे, तेजस गुरव, सुजित ढेरे अधिक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment