सातवणे येथील गणेश देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2023

सातवणे येथील गणेश देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

सातवणे येथील गणेश दर्शन

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         गणेश देखाव्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या  सातवणे (ता. चंदगड) गावात पहिल्या दिवसापासून देखावे पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.

     सातवणेतील सार्वजनिक तरुण मंडळांनी ऐतिहासिक देखावे निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. देखावे खुले झाले असून नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रिबदू बनलेल्या देखाव्यांच्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. नावीन्यपूर्ण देखावे सादर करण्यात मंडळाचा हातखंडा आहे.

      सातवणेत गावात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. घरगुती गणरायाच्या सजावटीसह तरुण मंडळांचे लक्ष देखावे निर्मितीकडे असते. धार्मिक-पौराणिक व सामाजिक  विषयावर आधारित देखावे आजही बनविले जातात. त्याच जोडीला आधुनिक तंत्रज्ञानाचा मागोवा घेण्याचा प्रयत्नही मंडळे करताना दिसतात. 

      गणेशोत्सवाचे निमित्त साधत सामाजिक बांधिलकी जपणारे देखावेही निर्माण करण्याकडे कल वाढत चालला आहे. यावर्षी प्रथमच हरिजन वस्तीमध्ये नेत्र दीपक विद्युत रोषणाई, हलते देखावे, मंदिराची प्रतीकृती सादर करण्यात आली आहे.

       महिला सक्षमीकरण, मातृपितृ देवो भव, अंधश्रध्दा निर्मूलन,डिजीटल शाळा, स्वच्छता अभियान, वनांचा ऱ्हास, गडकिल्ले संवर्धन अशा सामाजिक आणि विधायक विषयांवर मंडळाने केलेले देखावे पंचक्रोशीतील नागरिकांच्याही पसंतीस उतरले आहेत. केवळ पंचक्रोशीतीलच नव्हे तर कोल्हापूर,बेळगाव,गडहिंगलज,आजरा व कोकणातील भाविक सुध्दा प्रचंड संख्येने हजेरी लावत आहेत. 

No comments:

Post a Comment