कालकुंद्री ग्रामस्थांची दुष्काळावर मात....! 'ऐतिहासिक पाट पाणी योजना' श्रमदानातून सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2023

कालकुंद्री ग्रामस्थांची दुष्काळावर मात....! 'ऐतिहासिक पाट पाणी योजना' श्रमदानातून सुरू

कालकुंद्री येथे पाट पाणी योजनेतील पाट काढण्यासाठी श्रमदान करणारे शेकडो ग्रामस्थ.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत वावरत असताना कालकुंद्री ता. चंदगड येथील ग्रामस्थांनी पूर्वजांचा ठेवा असलेली ऐतिहासिक पाट पाणी योजना १३ वर्षांनंतर पुन्हा सुरू केली. एकजुटीचे भगिरथ दर्शन घडवत गावची ३५० हेक्टर जमीन ओलिताखाली आणली.
   यंदा पाऊस रुसल्यामुळे संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत वावरत आहे. चंदगड हा निसर्ग संपन्न व विपूल पाणी साठा असलेला तालुका गणला जातो. तथापि येथेही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र तालुक्यातील कालकुंद्री ग्रामस्थांनी पूर्वजांनी सुमारे २२५ वर्षांपूर्वी आपल्या कल्पकतेने सुरू केलेली मात्र गेली १३ वर्षे बंद असलेली  ऐतिहासिक शेती पाट पाणीपुरवठा योजना श्रमदानातून पुन्हा कार्यान्वित करून दुष्काळावर मात करण्याचा संकल्प केला आहे. 
   या बिना खर्चिक योजनेत किटवाड गावानजीक ओढ्यावर बांध घालून ताम्रपर्णी नदीपर्यंत सुमारे प्रत्येकी ६ ते ८ किमी लांबीच्या दोन पाटातून हे पाणी गावच्या शिवारातून फिरवले आहे.  यामुळे बेभरवशाच्या पावसावर अवलंबून न राहता दिवाळीपर्यंत गावच्या सुमारे साडेतीनशे हेक्टर शेतीला पाणी मिळते. गेल्या काही वर्षांत पुरेशा किंबहुना अति पावसामुळे  गावकऱ्यांचे या वैशिष्ट्यपूर्ण योजनेकडे दुर्लक्ष झाले होते. तथापि यंदाच्या संभाव्य दुष्काळाची चाहूल लागताच ग्रामस्थ खडबडून जागे झाले. बंद असलेली ही योजना सुरू करण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला.  'गाव  करील ते राव काय करील' या उक्ती प्रमाणे हजारो हात कामाला लागले. बघता बघता पाणी ८ किमी चा प्रवास करून ताम्रपर्णी नदीपत्रात पोहचले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत व पाणी पंच कमिटी यांच्या उपस्थितीत जल्लोषी वातावरणात पाणी पूजन झाले. सद्यःस्थितीत सुकत चाललेली सुमारे ५० टक्के भात शेती ओलिताखाली आली आहे.  योजनेची देखरेख, डागडुजी व मजुरीसाठी  एकरी नाममात्र फी आकारली जाते.
 १६ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रामसभेत  एम. बी. पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर पाट १३ वर्षे बंद असल्याने बऱ्याच ठिकाणी पाटाचे अस्तित्वच नाही. त्यामुळे योजना पुनर्जीवित होणे अशक्य आहे; असा सूर ९० टक्के नागरिकांनी लावला. तथापि उप सरपंच संभाजी पाटील व ग्रापं कमिटीने ठरावाद्वारे शिवाजी आप्पाजी कोकितकर यांना सर्वाधिकार दिले. लागलीच सरपंच सौ छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, शंकर वैजनाथ पाटील, भागोजी पाटील, पुंडलिक जोशी आदी १७ जणांची कमिटी नेमली. नियोजनबद्ध श्रमदानातून अस्तित्वहीन झालेले पाण्याचे पाट आठ दिवसात प्रवाहित केले. रक्षाबंधन रोजी पाणी नदी पात्रात आणून अशक्य ते शक्य केले. आता शेती ओलीताखाली येऊ लागल्याने शिवार व गावकरीही सुखावले आहेत. 
कालकुंद्री येथील ही ऐतिहासिक शेती पाणीपुरवठा योजना महाराष्ट्राला नक्कीच दिशादर्शक ठरेल...!


No comments:

Post a Comment