हलकर्णी महाविधालयात शिक्षक दिन उत्साहात
चंदगड / प्रतिनिधी
अनेक व्याख्यानातून ज्ञान मिळते. ज्ञान मिळवण्याची लालसा प्रत्येक विद्यार्थ्यांत पाहिजे. ज्ञान मिळवणे आणि माहिती गोळा करणे यात फरक आहे. स्वत:ची क्षमता ओळखा. मोबाईलचा अतिवापर टाळा. अभ्यासाच्या गप्पा मारा. पुस्तके वाचा नोंदी ठेवा. ग्रामीण भागातून आलोय हा न्युनगंड बाजूला सारा. अभ्यास, वाचन यावर लक्ष द्या. वाचनाचा ध्यास घ्या, वाचनाचा ध्यास असणारा विद्यार्थी आणि तो ध्यास पुर्ण करणारे पालक पाहिजेत.माणसात ध्येय असले पाहिजे. कर्तबगारीत ध्येय लपलेले असते. व्यावहारीक दृष्टीकोण आपणात पाहिजे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करा, अव्वलस्थान मिळवा. अवघड वाटेवरून प्रवास
केल्यास चालक तयार होतो,सक्षम माणूस अवघड रस्ता पार करत असतो. नम्रता पाहिजे ताठरपणा वाईट असतो. गुणांचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो. कोणतेही काम कमी नसते. कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान वाया जात नाही. माणसे घडविण्याचे काम शिक्षक करतो.'
असे प्रतिपादन आजरा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ एम एल होनगेकर यांनी केले.ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्थ संस्थेच्या गुरुवर्य गुरुनाथ विठठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष संजय पाटील होते. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविक ऐश्वर्या पाटील यांनी केले. पाहूण्यांचा परिचय हर्षदा केरुडकर यांनी करून दिला.
मान्यवरांचे स्वागत उपाध्यक्ष संजय पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील,प्रा डॉ अनिल गवळी, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा पी ए बोभाटे, शिक्षक दिनाच्या प्राचार्या इंद्रायणी पाटील, उपप्राचार्य अभिषेक कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी अनुराधा शिरगावकर, आरती पाटील, अभिषेक कांबळे, इंद्रायणी पाटील या विद्यार्थी शिक्षकांनी आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात संजय पाटील म्हणाले, ' शिक्षक आपल्या जिवनात सर्वश्रेष्ठ असतात त्यांना आदर्श माणून वाटचाल करा. शिक्षकांचे योगदान मोठे असते. शिक्षक माणूस घडवतो. ते सक्षम माणूस घडविण्याचे पवित्र काम करत असतात, म्हणून त्यांचे काम खूप मोठे असते'.
यावेळी निलम पाटील या विद्यार्थीनीं चा सन्मान प्रमुख पाहुण्यानी केला . तर तालुकास्तरीय फ्री स्टाईल कुस्ती क्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्या बददल शुभम पाटील ( ११ वी) या विद्यार्थ्याचा ही गौरव करण्यात आला.
यावेळी सर्व शिक्षकांचा पेन व पुष्प देवून विद्यार्थांनी सन्मान केला. सकाळी विद्यार्थी शिक्षकांनी वर्गात तासिका घेतल्या तर नंतर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. सुत्रसंचालन कोमल होनगेकर यानी केले तर रसिका कांबळे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment