अडकूर : रवळनाथ गणेश मंडळ व बेळगाव केएलई हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबारात २२०० रुग्णांची तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2023

अडकूर : रवळनाथ गणेश मंडळ व बेळगाव केएलई हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबारात २२०० रुग्णांची तपासणी

 

आरोग्य तपासणीचा लाभ घेताना.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         अडकूर (ता. चंदगड) येथे रवळनाथ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ व के. एल. ई. रुग्णांलय बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा २२०० रुग्णांनी लाभ घेतला. के. एल. ई. हॉस्पिटलमधील विशेष डॉक्टरांची टीम सल्लामसलत आणि तपासणीसाठी उपलब्ध होती. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. 

     रक्तदाब, रक्तातील साखर, डोळ्यांची तपासणी, हाडांची तपासणी, मणक्याचे आणि मेंदूची तपासणी, ईसीजी, इको अशा सर्व तपासण्या डॉक्टरांच्या पथकाने केल्या. रुग्णांशी समन्वय साधण्यासाठी कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, जनरल मेडिसिन, नेत्ररोग, बालरोग, शस्त्रक्रिया, ईएनटी आणि त्वचाविज्ञान विभागातील विशेष डॉक्टर उपलब्ध होते.

       यावेळी अडकूर येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोमजाळ, केंद्रीय कृषी सल्लागार डॉ. परशराम पाटील, अडकुर येथील रवळनाथ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयंतदादा अडकूरकर उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोमजाळ यांनी उपस्थितांना संबोधित करताना गरजू रुग्णांपर्यंत सेवा पोहोचण्यासाठी अशा प्रकारची आरोग्य शिबिरे घेणे गरजेची आहेत. गरजू रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी केएलई हॉस्पिटलने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

      डॉ. परशुराम पाटील यांनी केएलई हॉस्पिटल, बेळगावी येथे उपलब्ध असलेल्या महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेसारख्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. रुग्णांनी कोणत्याही मदतीसाठी ०८३१-२५५१११७ वर संपर्क साधावा असे आवाहन के. एल. ई. हॉस्पिटलच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a Comment