मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको, पाटणे फाटा येथील बैठकीत एकमुखी निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2023

मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको, पाटणे फाटा येथील बैठकीत एकमुखी निर्णय

पाटणे फाटा येथे मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीसाठी जमलेले मराठा बांधव. 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचा अनेक वर्षापासून लढा सुरु आहे. जालना येथे सुरु असलेल्या मराठा आंदोलनाला चंदगड तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने पाटणे फाटा येथे जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बुधवारी सकाळी ११ वाजता पाटणे फाटा येथे रास्तारोको करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

     शिवाजीराव पाटील यांनी मराठा समाजाचा घटक म्हणून मी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. यावेळी गोपाळराव पाटील यांनी राजकीय जोडे बाजूला ठेऊन आरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. प्रा. दीपक पाटील यांनी आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट केले. ड. संतोष मळविकर यांनी केवळ पाठिंबा देऊन चालणार नाही तर लोकप्रतिनिधींनी याची जबादारी घ्यावी, असे सांगितले. सकल मराठा आरक्षणासाठी दुही माजावण्याचे काम काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या संदेशाची पडताळणी करा, असे सांगितले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

      यावेळी शंकर मनवाडकर, विष्णू गावडे, भारत गावडे, गणेश फाटक, अशोक गावडे यांनी ही सूचना मांडल्या. यावेळी शांताराम पाटील विलास पाटील, जगन्नाथ हुलजी, नामदेव पाटील, जानबा चौगुले, राजू पाटील, संजय पाटील उपस्थित होते. बुधवारी सकाळी तालुक्यातील मराठा समाजाच्या आंदोलनात सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन ही सुरेश सातवणेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment