महाराष्ट्र कामगार मंडळाने वाढत्या महागाईचा विचार करून शिष्यवृत्ती व इतर योजनांमध्ये भरघोस वाढ करावी, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची शासनाकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2023

महाराष्ट्र कामगार मंडळाने वाढत्या महागाईचा विचार करून शिष्यवृत्ती व इतर योजनांमध्ये भरघोस वाढ करावी, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची शासनाकडे मागणी

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने विविध योजना व उपक्रम संपुर्ण राज्यभर राबविले जातात. ज्या योगे राज्यातील कामगार वर्गाची सर्वांगिण उन्नती व प्रगती साधली जाते. यामध्ये विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती व गंभीर स्वरूप आजार या योजनांचा देखील समावेश आहे. 

       सध्याची वाढती महागाई व त्या अनुषंगाने उच्च शिक्षणासाठी व गंभीर स्वरूप आजार यासाठी होणारा खर्च यांचा ताळमेळ बसविणे सर्वसामान्य कामगारांना अवघड झाले आहे. यापूर्वी देखील मंडळ प्रशासनास कोणतेही योग्य कारण न देता बंद करणेत आलेल्या सर्व योजना पूर्ववत सुरु करणेबाबत पत्रव्यवहार व प्रत्यक्ष सकारात्मक चर्चा देखील केलेल्या आहेत. सदर पत्रव्यवहारांच्या अनुसंगाने सध्याच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती व गंभीर स्वरूप आजार या योजनांच्या निधी मध्ये पाच पट वाढ करावी. 

       तसेच सध्या बंद असलेल्या अनेक योजना पूर्ववत सुरु कराव्यात, यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या प्रशासनास योग्य ते आदेश पारित करावेत, अशा आशयाचे लेखी निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, प्रधान सचिव व मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांना देण्यात आले.निवेदनावर राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर व मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे, भगवान माने, संजय सासणे, सुभाष पाटील, महादेव चक्के, संभाजी थोरात, अनिता काळे, शिवाजी चौगुले, सुरेश पोवार, बाळासाहेब कांबळे, प्रभाकर काबंळता, तानाजी निकम, संतोष तावडे, बाळकृष्ण तावडे अजय दळवी, सत्यवान भास्कर, भरत सकपाळ, संजय कदम, श्रीकांत पाटील, रमेश तळसकर, मुनीर मुल्ला आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment