कुदनूर येथे चंदगड पोलिसांचा रूट मार्च, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांचे मंडळांना मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2023

कुदनूर येथे चंदगड पोलिसांचा रूट मार्च, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांचे मंडळांना मार्गदर्शन

 

कुदनूर येथे गणेशोत्सव निमित्त रूट मार्च प्रसंगी पोलीस,एसआरपी व होमगार्ड पथक

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील अति संवेदनशील गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुदनुर येथे गणेशोत्सव निमित्त चंदगड पोलिसांनी रूट मार्च केला. काल दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता झालेल्या रूट मार्चमध्ये ४ अधिकारी, १२ अंमलदार, १५ होमगार्ड तर एक एस आर पी प्लाटून सहभागी झाले होते. प्राथमिक शाळेनजीकच्या पिंपळकट्टा चौकापासून तळगुळी फाटा असा एक किलोमीटर लांबीचा मार्च करण्यात आला.

     रूट मार्च नंतर गावातील  सर्व ६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी तसेच गावातील मुस्लिम समाजाचे पुढारी यांची संयुक्त बैठक ग्रामपंचायत कार्यालय कुदनूर येथे घेण्यात आली. यावेळी चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी मार्गदर्शन करताना डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा. मिरवणुका रात्री १२ पूर्वी संपवाव्यात, मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. सर्व मंडळांनी यांनी वेळेचे बंधन पाळून सण उत्सव साजरा करावा, गणपती मिरवणुकी मुळे वाहतूकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

         मूर्ती प्रतिष्ठापणे पासून विसर्जनापर्यंत मंडपात २४ तास (दिवसा व रात्रौ) स्वयंमसेवक नेमावेत. मिरवणूकी वेळी लेझर लाईट किंवा शरीराला अपायकारक विद्युत उपकरणाचा वापर करू नये, विद्युत रोषणाई बाबत विज कंपनी कडून योग्य ती परवानगी घ्यावी. विसर्जन मिरवणूक प्रसंगी मंडळातील कोणत्याही सदस्य व कार्यकर्त्यांने चुकीचे वर्तन करू नये. सोशल मीडिया माध्यमातून वादग्रस्त पोस्ट, स्टेटस् प्रसारित करू नयेत. असे कोणी करत असल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास संपर्क साधण्याचे आवाहन करताना गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

      यावेळी पोलीस पाटील नामदेव लोहार, सरपंच सौ. संगीता घाटगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष, मुस्लिम समाज अध्यक्ष, सर्व ६ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

                

No comments:

Post a Comment