'मेरी मांटी, मेरा देश' अंतर्गत 'चंदगड' ची माती 'दिल्ली'ला रवाना - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2023

'मेरी मांटी, मेरा देश' अंतर्गत 'चंदगड' ची माती 'दिल्ली'ला रवाना

 

चंदगड तालुक्यातून जमा केलेल्या मातीचे कलश अमेय सबनीस यांच्याकडे सुपूर्द करताना गटविकास अधिकारी सुभाष सावंत, जगन्नाथ हुलजी व मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

          'आजादी का अमृत महोत्सव'  निमित्त 'मेरी माटी, मेरा देश' उपक्रमांतर्गत चंदगड तालुक्यातून जमा केलेली माती लवकरच दिल्लीला रवाना होत आहे. तालुक्यातील १०९ ग्रामपंचायती, चंदगड नगरपंचायत व शासकिय कार्यालया मार्फत गावागावांतील माती मातीच्या कलशात जमा करण्यात आली आहे. हे कलश दिल्लीला पोहोचवण्यासाठी युवक व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र कोल्हापूरचे प्रतिनिधी अमेय विलास सबनीस (चंदगड) यांच्याकडे पंचायत समिती चंदगड येथे दि. ०९/१०/२०२३ रोजी सुपूर्द करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी सुभाष सावंत, माजी सभापती जगन्नाथ हुलजी यांच्यासह विविध गावचे ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती. चंदगडी माती दिल्लीला घेऊन जाण्याचे भाग्य आपल्याला मिळाले. याबद्दल सबनीस यांनी भारत सरकारचे आभार मानले. 

    देशभरातून जमवलेली ही  सर्व माती  दिल्ली येथे  एका ठिकाणी एकत्र करून तेथे 'अमृत वाटिका' तयार केली जाणार आहे. 'माटी को नमन, विरोंको वंदन' अंतर्गत विविध रोपांनी वाटिका सजणार आहे. यातून विविधतेतुन एकता हा संदेश जगभर पोहचेल...! ही आपल्या शहिद जवानांसाठी आदरांजलीच असेल. चंदगड मधील व्यक्ति तिथे गेला तर आपल्या गावच्या मातीचा सुवास या अमृत वाटिकेत त्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment