![]() |
कोरज येथील बाबाजी देवळी रहात असलेले जळून खाक झालेले घर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मौजे कोरज (ता. चंदगड) येथील बाबाजी सखाराम देवळी यांच्या राहत्या घरी अचानक आग लागल्याने त्यांचे घर जळून खाक आहे. यामध्ये संसारोपयोगी साहित्य व शेतीची औजारांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये अंदाजे दोन ते अडीज लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या दरम्यान हि घटना घडली.
यासंदर्भात घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी की, कोरज गावामध्ये बाबाजी देवळी यांचे घर होते. मात्र ते ऑगस्ट २०२२ मध्ये मोठ्या पावसात पडले. त्यामुळे बाबाजी हे आपल्या कुटुंबासह गावातीलच शिवाजी रामू देवळी यांच्या घरी रहात होते. परिस्थिती बेताचे असल्याने मिळेल ते काम करुन ते आपले कुटुंब चालवत होते. शनिवारी (ता. ७) रात्री बाबाजी यांच्या घरची मंडळी गावात म्हाळ असल्यामुळे तेथे गेले होते. दरम्यान रात्री साडेआठच्या दरम्यान बाबाजी यांचे कुटुंब रहात असलेल्या शिवाजी यांच्या घरातून धुर व पेटत्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे शेजारांनी पाहिले. त्यांनी आरडाओरडा गेल्यानंतर लोक जमा झाले. मिळेल ते घेवून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आगीमध्ये घरातील धान्य, मुलांचे शाळेचे साहित्य, दप्तर, कपडे व इतर सर्व वस्तू जळून खाक झाल्या.
शेतातील भात व घर मालकाचे शेती उपयोगातील २५ पियुशी पाईप, घराचा संपूर्ण थाट व घराची कवले व इतर संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या. यामध्ये अंदाजे दोन लाख ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा करुन शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी. या पिडीत कुटुंबाला समाजातील दानशुर व्यक्तींनी घर उभे करण्यासाठी मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment