दुर्लक्षित समाजसेवकांचा कालकुंद्री येथे गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2023

दुर्लक्षित समाजसेवकांचा कालकुंद्री येथे गौरव

 

कल्मेश्वर मंदिर येथे डॉक्टर राजाराम पाटील व श्रीमती शांता नाईक यांचा सत्कार करताना सरपंच, उपसरपंच व एसएससी बॅचमधील विद्यार्थी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      कालकुंद्री (ता. चंदगड) येथील दोन दुर्लक्षित समाजसेवकांचा सन्मान गावातील  एस. एस. सी. बॅच १९९६-९७ यांच्या वतीने नुकताच करण्यात आला. श्री कल्मेश्वर मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात गावातील पशु वैद्यक म्हणून अहोरात्र सेवा बजावणारे राजाराम निंगाप्पा पाटील तसेच गावातील आडलेल्या बाळंतिणीची सोडवणूक करणाऱ्या सुईन बाई श्रीमती शांता नागोजी नाईक यांचा शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, साडी- चोळी व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

      सत्कारमूर्ती राजाराम पाटील यांचे शिक्षण कमी असून सुद्धा केवळ अनुभवातून जनावरांचे डॉक्टर म्हणून पंचक्रोशीत नाव कमावले आहे. गाव व परिसरातील हजारो पशुधनाचे प्राण वाचवण्याबरोबरच त्यांना आजारातून बरे केले आहे. परिसरातील विविध पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्या अनुभवाचा उपयोग अवघड शस्त्रक्रिया व इतर वेळी करून घेत असतात. तसेच गावच्या सुईन म्हणून श्रीमती शांताबाई आयुष्यभर विना मोबदला अडलेल्या बाळंतिणींना धीर देणे त्यांची नॉर्मल डिलिव्हरी करून त्यांची सोडवणूक करणे. असे कौतुकास्पद कार्य केले आहे. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एसएससी बॅच विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. छाया जोशी होत्या. यावेळी उपसरपंच संभाजी पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच एसएससी बॅचचे मित्र मैत्रिणी विनोद पाटील, भाऊ पाटील, विजय पाटील, कल्लाप्पा बागिलगेकर, लक्ष्मण पाटील कल्लाप्पा गायकवाड, खाजा शेख, जोतिबा कोकीतकर, बाबू पाटील, गणपती गोंधळी, प्रभाकर पाटील, मारुती सावंत, अक्कूताई कोकीतकर आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन के. जे. पाटील यांनी केले.  विजय पाटील (महाराष्ट्र पोलीस) यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment