चंदगड तालुक्यात ३२ ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान...! ५ नोव्हेंबर रोजी मतदान, ६ रोजी मतमोजणी - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2023

चंदगड तालुक्यात ३२ ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान...! ५ नोव्हेंबर रोजी मतदान, ६ रोजी मतमोजणी


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील मिनी विधानसभा अर्थात ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान सुरू झाले आहे. १ जानेवारी  ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील एकूण २२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम तहसीलदार चंदगड यांच्या ६ ऑक्टोबर रोजी च्या पत्रानुसार जाहीर झाला आहे. यासोबतच तालुक्यातील १० ग्रामपंचायतीमधील विविध कारणास्तव रिक्त असलेल्या जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

      २०२४ हे वर्ष निवडणूकांचे वर्ष असणार आहे. या वर्षभरात लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा अशा सर्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम भरगच्च कार्यक्रम असणार आहे. त्याचा धुरळा या ग्रामपंचायत निवडणुकांपासून उडायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या एकूण ८९ ग्रामपंचायत निवडणुकांपैकी सर्वाधिक २२ ग्रामपंचायती  चंदगड तालुक्यातील असून  होत असलेल्या ४८ पोटनिवडणुकांपैकी सर्वाधिक १० ग्रामपंचायती सुद्धा चंदगड तालुक्यातीलच आहेत. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.

   निवडणूक होत असलेल्या २२ गावात आंबेवाडी, अमरोळी, बुझवडे, भोगोली, गणूचीवाडी, जट्टेवाडी, कडलगे खुर्द, कलिवडे, कानूर खुर्द, कोदाळी, कुरणी, लाकूरवाडी, माणगाव, मिरवेल, मुरकुटेवाडी, सडेगुडवळे, शिरोली-सत्तेवाडी, शिवणगे, तांबुळवाडी, तुर्केवाडी, उमगाव, उत्साळी या गावांचा समावेश असून पोटनिवडणूक होत असलेली चिंचणे, कामेवाडी, ढोलगरवाडी, वाघोत्रे, मांडेदुर्ग, कागणी, बुक्किहाळ, शिरोळी खुर्द, बोंजुर्डी, पुंद्रा ही १० गावे आहेत.निवडणुका लागलेल्या गावातील पुढारी पक्ष तसेच स्थानिक पातळीवर आघाड्या करण्यासाठी जोडण्या लावण्यात गुंतले आहेत.


निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे- 

१)निवडणूक नोटीस प्रसिद्ध करणे- ६/१०/२०२३. 

२)उमेदवारी अर्ज भरणे- १६ ते २०/१०/२०२३ (वेळ सकाळी ११ ते ३)

३)उमेदवारी अर्ज छाननी- २३/१०/२०२३.

४)उमेदवारी अर्ज मागे घेणेची अंतिम तारीख २५/१०/२०२३ (दुपारी ३ पर्यंत). 

५)निवडणूक चिन्ह वाटप करणे २५/१०/२०२३ (दुपारी ३ नंतर).

६)मतदान तारीख- ५/११/२०२३ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०).

७)मतमोजणी व निकाल घोषित करणे - दि. ६/११/२०२३, दुर्गम भागासाठी ७/११/२०२३.

No comments:

Post a Comment