तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, अंगणवाडी सेविकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करणारे, समाजवादी विचारसरणीचे ज्येष्ट नेते व गडहिंग्लजचे माजी आमदार अॅड. श्रीपतराव दिनकरराव शिंदे यांचे शनिवारी (१४ ऑक्टोबर) सायंकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८७ वर्षाचे होते. पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. १९८५ व १९९० मधील विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. सलग दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
शिंदे हे जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. सध्या त्यांच्याकडे जनता दलाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीतील लढवय्या, उपेक्षितांच्या हक्कासाठी संघर्ष करणारा आणि समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेता हरपला अशा शब्दांत त्यांना भावना व्यक्त होत आहेत.
गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूल हे त्यांचे जन्मगाव. वडील दिनकरराव शिंदे यांच्या संस्काराचा त्यांच्यावर पगडा होता. शिंदे यांची जडणघडण राष्ट्र सेवा दलात झाली होती. आयुष्यभर त्यांनी समाजवादी विचार जोपासला. कष्टकरांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख कायम राहिली. धरणग्रस्त, शेतकरी, शेतमजूर, अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नासाठी ते सतत लढत राहिले. अंधश्रद्धा निर्मूलन, देवदासी निर्मूलन चळवळीत आघाडीवर काम केले.काही वर्षे माध्यमिक शिक्षक होते. गडहिंग्लज येथे वकिलीही केली.
एकवेळ ते गडहिंग्लजचे आमदार होते. गडहिंग्लज राजकारणात त्यांचा वरचष्मा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज नगरपालिका जनता दलाच्या ताब्यात आहे. दरम्यान गेले काहीं दिवस त्यांच्या प्रकृतीत चढउतार होते. उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये हलविले होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी गडहिंग्लज येथे आणण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी उर्मिलादेवी,. कन्या डॉ. रचना थोरात (कराड), गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती महेश कोरी, चार भाऊ, बहिण , जावई, नातंवडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment