सशक्त भारत व्यसनमुक्त होणे अत्यावश्यक - संजय भाई, माडखोलकर महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियान - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2023

सशक्त भारत व्यसनमुक्त होणे अत्यावश्यक - संजय भाई, माडखोलकर महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियान

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         'जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. व्यसनामुळे माणसाचे शरीर पोखरले जाते. सध्या आपल्या देशाचे चित्र युवकांचे व्यसन, युवतींची फॅशन आणि घरादाराला टेन्शन असेच आहे.  व्यसनामुळे माणसाच्या मेंदू ची संवेदनशीलता संपुष्टात येते .हळूहळू माणूस व्यसनाच्या आहारी जातो. तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, मद्यपान, चरस, अफू, गांजा अशा व्यसनाकडे युवावर्ग आकर्षित होतो आहे. युवतीसुद्धा वेगाने व्यसनाकडे वळत आहेत ही खेदजनक बाब आहे. असे प्रतिपादन ब्रह्माकुमारीच्या संजय भाई यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या "नशामुक भारत अभियान" कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे होते.

           ब्रह्माकुमारीच्या संजय भाई यांनी ``युवकांनी मेडिटेशन करावे. 'देह देवाचे मंदिर' हे लक्षात ठेवून निरामय आरोग्य जोपासावे. शरीराप्रमाणेच मनदेखील कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा करावी. सकारात्मक विचारांनी स्वतःच्या जीवनाला आकार देता येणे शक्य आहे. गुटख्यामुळे टार नावाचा पदार्थ तयार होतो व तो जीवघेण्या कॅन्सरचे निमित्त ठरतो.विदेशी कंपन्या आपल्या देशाला लक्ष्य बनवण्यासाठी वेगवेगळी उपकरणे बाजारात आणत आहेत. स्मोकिंग मशीन हे असेच एक घातक उपकरण आहे. ते दप्तरात सहज मावते. त्यातून विविध प्रकारच्या फ्लेवर मध्ये धूम्रपान करता येते.पाचशेपासून चौदा हजार पर्यंत किंमतीची ही मशीन शहरातील श्रीमंत मुलींच्या दप्तरात आढळत आहेत. सकारात्मक दृटिकोनातून जीवन जगण्याचा हृढनिश्चय केला पाहिजे व व्यसनापासून जाणीवपूर्वक दूर राहायला हवे." 

       यावेळी शारदा बहन यांनी मेडिटेशनचे प्रात्यक्षिक घेतले व 87 वर्षे प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय 144 देशात करत असलेल्या कार्याची माहिती दिली. अंकिता गुरव हिने सूत्रसंचालन केले .एस.व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. जी. वाय. कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पुष्पाताई नेसरीकर, विनायक भाई, डॉ. आर. ए. कमलाकर, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. एन. एस. मासाळ, डॉ. एस. एन. पाटील, पी. पी. धुरी, अनिल पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment