रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र...!, 'मराठा आरक्षणासाठी' हर्षल पाटील यांनी पत्रातून मांडली कैफियत - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2023

रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र...!, 'मराठा आरक्षणासाठी' हर्षल पाटील यांनी पत्रातून मांडली कैफियत

रक्ताने माखलेले पत्र देताना हर्षल पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        मराठा समाजातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये  बुद्धिमत्ता, गुणवत्ता असूनही आरक्षणाअभावी त्यांना शासकीय निमशासकीय नोकऱ्यांपासून वंचित राहावे लागत असल्याने मराठा समाज पुरता उरपळून निघत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी पडणाऱ्या कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे मराठा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोईजड झाला आहे. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाची वाताहत पाहता "दुष्काळ जगू देत नाही अन आरक्षण शिकू देत नाही"  अशी दयनीय अवस्था झाली आहे.          गेली अनेक वर्षे आश्वासने व विविध अडथळ्यांच्या विळख्यात अडकलेले मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण तात्काळ द्यावे या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोरगाव बुद्रुक (ता. जाफ्राबाद, जि. जालना) येथील शेतकरी पुत्र हर्षल मोतीराम फदाट-पाटील यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून मराठा समाजातील तरुणांची कैफियत मांडली आहे. हे पत्र हर्षल पाटील यांने जाफराबाद येथील जाहीर सभेदरम्यान शासनाकडे सादर करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांचेकडे सुपूर्द केले.

     १४ ऑक्टोंबर रोजी अंतरवाली सराटी येथे दीडशे एकर क्षेत्रावर मराठ्यांच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बोरगाव बु (ता.जाफ्राबाद) येथील हर्षल मोतीराम फदाट या शेतकरी पुत्रांने आपल्या रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिले आहे.  "दुष्काळ जगू देत नाही,आरक्षण शिकवू देत नाही" शिवाय मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे अनेक दिवसांपासून आंदोलन, आमरण उपोषण करत आहे. त्यांच्या पाठीशी मराठा समाज उभा आहे. आपण मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अशी मागणी हर्षल पाटील यांनी या पत्रात नमूद केली आहे.

No comments:

Post a Comment