कालकुंद्री येथे पाट- पाणी योजना कार्यान्वित केलेल्या पंच कमिटीचा ग्रामस्थांनी केला सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2023

कालकुंद्री येथे पाट- पाणी योजना कार्यान्वित केलेल्या पंच कमिटीचा ग्रामस्थांनी केला सन्मान

कालकुंद्री येथील पाटपाणी योजना सुरू करून शिवार ओलिताखाली आणण्यात निर्णायक भूमिका बजावलेले पाणी पंच कमिटीचे सदस्य.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

     कालकुंद्री (ता. चंदगड) येथील २३० वर्षांपूर्वीपासून सुरू असलेली ऐतिहासिक पाट पाणी योजना गेली काही वर्षे बंद होती. या कारणाने बऱ्याच ठिकाणी पाणी वाहून नेणारे पाट अस्तित्वातच नव्हते. यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता ही योजना कार्यान्वित करून शेतीला पाणी देणे गरजेचे होते. हे अत्यंत अवघड काम पूर्ण करून गावातील सुमारे ३८४ हेक्टर शेती ओलीताखाली आणण्याचे भगिरथ कार्य गावातील पाटपाणी पंच कमिटीने पूर्णत्वास नेले. यामुळे शिवारातील भात शेती डौलाने फुलली, या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून ग्रामस्थांनी पाणी पंच कमिटीतील सर्व ३० सदस्यांचा शाल, श्रीफळ, भेटा देऊन सन्मान केला.

   सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य, श्री कलमेश्वर अखंड नाम सप्ताह कमिटी सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी सरपंच एन के पाटील, शिवाजी कडोलकर, जी एस पाटील, श्रीकांत वै. पाटील, के जे पाटील आदींच्या हस्ते पाणी पंच कमिटी चा सन्मान करण्यात आला. यावेळी कमिटी अध्यक्ष शिवाजी आप्पाजी कोकितकर, श्रीकांत पाटील, के जे पाटील, विजय पाटील यांची भाषणे झाली. गावातील वयोवृद्ध शेतकरी बाबू लक्ष्मण पाटील यांच्या वतीने भरत पाटील यांनी सदस्यांना फेटे बांधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एम बी पाटील यांनी मानले. श्री कलमेश्वर मंदिर सभा मंडप येथे झालेल्या कार्यक्रमाला शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment