भारत- पाकिस्तान युद्धात जायबंदी, माजी सैनिक व संशोधक शेतकरी : कुदनूरचे सुपुत्र कै भावकू मुतकेकर - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2023

भारत- पाकिस्तान युद्धात जायबंदी, माजी सैनिक व संशोधक शेतकरी : कुदनूरचे सुपुत्र कै भावकू मुतकेकर

 

कै. भावकू मुतकेकर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

       कुदनूर (ता. चंदगड) येथील रहिवाशी माजी सैनिक तसेच एक संशोधक शेतकरी म्हणून परिचित असलेले कै. भावकू भरमा मुतकेकर (वय ९०) यांचे ३० सप्टेंबर २०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

   स्वातंत्र्यसैनिक वडील कै. भरमा यल्लाप्पा मुतकेकर यांच्याकडून देशसेवेचा वसा लाभलेले भावकू सैन्यात भरती झाले. १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवला. यावेळी पायाला बंदुकीची गोळी लागून ते जायबंदी झाले होते. युद्धात यशस्वी होऊन परतल्यानंतर त्याकाळी त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यांचा एक भाऊ भारत- चीन युद्धात शहीद झाला आहे. 

       देशसेवेची परंपरा लाभलेल्या भावकू यांनी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वाहून घेतले. गावातील सिद्धेश्वर विकास सेवा संस्थेचे ते १५ वर्षे संचालक तर १० वर्षे चेअरमन होते. एक प्रगतशील शेतकरी म्हणूनही ते जिल्ह्याला परिचित होते. अनेक संकरित वाणांची लागवड करत असताना 'बिन पाण्याच्या ऊसाचा' प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला. किणी कर्यात भागातील अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या उसाची लागवड त्या काळात केली होती. याची चर्चा १९९० मध्ये तत्कालीन आमदार नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात झाली होती. 

      शेतीबरोबरच पशुपालन व दुग्ध व्यवसायात ठसा उमटवत गावातील कामधेनु दूध संस्थेच्या माध्यमातून गोकुळ दूध संघाचा सर्वाधिक दूध उत्पादक शेतकरी म्हणून  प्रथम पुरस्कार अनेक वेळा पटकावला होता. हे सर्व करत असताना मुलगा व ४ मुलींना सुसंस्कारित बनवले. या कामी त्यांना पत्नी कै सौ शांता यांचेही मोलाचे सहकार्य लाभले होते. त्यांचे चिरंजीव सुधीर हे शिक्षण विस्तार अधिकारी पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. माजी सैनिक असूनही आपली कडक शिस्त बाजूला ठेवून गाव व परिसरातील आबालवृद्धांशी आदराने बोलणारे आणि वागणारे, मितभाषी कै भावकू भरमा मुतकेकर अनेक वर्षे सर्वांच्या चिरंतन स्मरणात राहतील.



No comments:

Post a Comment