आरोग्य विभागाच्या वतीने 20 नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान संयुक्त सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम व कुष्ठरोग्ण शोध अभियान - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2023

आरोग्य विभागाच्या वतीने 20 नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान संयुक्त सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम व कुष्ठरोग्ण शोध अभियान

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         आरोग्य विभागाच्या वतीने २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ दरम्यान संयुक्त सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम व कुष्ठरोग्ण शोध अभियान आयोजित केल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी दिली. 

१) सदरील अभियानासाठी तालुक्यामध्ये 172 पथक तयार करण्यात आलेली आहे.

२) पुढीलपैकी कोणतेही एक लक्षण असल्यास संशयित क्षय रुग्ण (tuberculosis)समजावा-दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकी वाटे रक्त पडणे, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे इत्यादी पैकी कोणतेही लक्षण असल्यास सदरील रुग्णाचा छातीचा एक्स-रे व थुंकी तपासली जाते व त्यानंतर निदान झाल्यास सहा महिन्याचा औषध उपचार मोफत दिला जातो व सदरील रुग्ण पूर्णपणे बरा होतो.

३) कुष्ठरोग (leprosy) ची सर्वसाधारण लक्षणे-अंगावर असणारे एक किंवा अनेक फिकट लालसर बधिर चट्टे, कानाच्या पाळ्या जाड होणे, चेहरा लालसर तेलकट व जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, त्वचेची संलग्न मज्जा (nerve) जाड व दुखऱ्या होणे, हाता पायामध्ये मुंग्या येणे इत्यादी, सदरील रुग्णाचे निदान झाल्यास एक वर्ष मोफत औषध उपचार दिला जातो व रुग्ण पूर्णपणे बरा होतो.

४) वरील क्षयरोग अथवा कुष्ठरोग याची संशयित लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालय यांच्याशी संपर्क करावा तेथे सदरील औषधोपचार व तपासणी पूर्णपणे मोफत केली जाते.

५) वरील अभियान कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या प्रशिक्षित स्वयंसेवकाकडून वरील प्रमाणे लक्षणे असतील तर तपासणी करून घ्यावी आणि त्यांना सहकार्य करावे असे आवाहन गटविकास अधिकारी सुभाष सावंत व आरोग्य विभागाच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a Comment