चंदगड तालुक्यातील आदिवासींची गावे रस्त्यांपासून वंचित...! लक्ष देण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2023

चंदगड तालुक्यातील आदिवासींची गावे रस्त्यांपासून वंचित...! लक्ष देण्याची मागणी

कोवाड- बेळगाव राज्य मार्ग ते कल्याणपूर रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुरावस्था.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
  चंदगड तालुक्यातील कामेवाडी व कल्याणपूर ही १०० टक्के 'महादेव कोळी' आदिवासी बांधवांची वस्ती असलेली गावे गेली अनेक वर्षे चांगल्या रस्त्यांपासून वंचित आहेत. दोन्ही गावे तालुक्याच्या पूर्व भागात असून कोवाड ते कामेवाडी १० किमी तर कल्याणपूर फाटा ते गाव १ ते दिड किमी हे रस्ते गेली अनेक वर्षे दुरावस्थेत आहेत. या  रस्त्यांचे तात्काळ रुंदीकरण, खडीकरण, डांबरीकरण करावे अशी मागणी येथील आदिवासी बांधवांनी केली आहे.
   कोवाड- बेळगाव या मुख्य मार्गापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर आत दुर्गाडी टेकडीच्या पायथ्याशी कल्याणपूर गाव वसले आहे.  शेकडो वर्षे सोयी- सुविधांपासून हे आदिवासी वंचित आहेत. त्यात आता खराब रस्त्याची भर पडली आहे. नाही म्हणायला घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील 'ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजनेतून' कल्याणपूरसाठी गावांतर्गत रस्ते कामासाठी दीड वर्षांपूर्वी १५ लाख रुपये मिळाले होते. तर यंदा चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची शिफारस व गावातील सुबराव पाटील (सेवानिवृत्त कंडक्टर), वाय. व्ही. पाटील (सेवानिवृत्त वन अधिकारी),  एस. बी. पाटील (सेवानिवृत्त मंडल अधिकारी) आदी ग्रामस्थांच्या धडपडीतून १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. पण गावापर्यंत येणाऱ्या मुख्य रस्त्याचे काय? असा सवाल ग्रामस्थ विचारत असून या खराब रस्त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षात पै पाहुण्यांनी देखील गावाकडे पाठ फिरवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
   या रस्त्याचा उपयोग केवळ कल्याणपूरसाठी नसून पुढे बुक्किहाळ बुद्रुक, बुक्किहाळ खुर्द, करेकुंडी, ढोलगरवाडी, सुंडी, महिपाळगड ते शिनोळी येथे बेळगाव- वेंगुर्ला राज्य मार्गापर्यंत जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा व जवळचा असल्याने इकडून वाहतूक वाढली आहे. त्यामुळे आमदार राजेश पाटील यांनी या कामी लक्ष घालून मागणीची पूर्तता करावी अशी मागणी कल्याणपूर ग्रामस्थांसह मार्गावरील प्रवासी व वाहनधारकांनी केली आहे.


No comments:

Post a Comment