धनगरवाड्यावर हत्तीनी केलेली भात पिकाची नासधूर |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
हत्तींचा धुमाकूळ आठ दिवसापासून कानुर (ता. चंदगड) धनगर वाड्यावर सुरू आहे. या हत्तीनी परिसरातील शेतकऱ्यांच्या भात, नाचणा पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले असून त्यांचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य यशवंत क्रांती संघटनेचे राज्य संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यानी केली आहे.
चंदगड व आजरा तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ कायमच सुरू आहे. गवे, बिबट्या वाघ यासारख्या वन्य प्राण्यांचा तर त्रास सुरू होताच परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून हत्तींचे संकट या तालुक्यातील धनगर वाड्यावरती कोसळले आहे. मुळातच सर्व धनगरवाडे हे वनहद्दीत पुर्वी पासून आहेत. त्यांची शेती घरे वन जमिनीवरच. तेथेच ते पिढ्यानपिढ्या शेती करीत आहेत. कोल्हापुर परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी परिपत्रक काढून वन हद्दीतील नुकसान भरपाई देण्यात येऊ नये व नुकसानीचे पंचनामे ही करू नयेत असे परिपत्रक काढल्याने वन अधिकारी बघायला सुद्धा तिकडे फिरकत नाहीत. आम्ही बघून काय करणार? तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही? असे सांगतात. हे कायदे म्हणजे इंग्रजांच्या जुलमी कायद्यापेक्षा भयंकर आहेत अशी भावना येथील धनगर ग्रामस्थांची आहे. हाता तोंडाशी आलेले नाचना व भाताचे पिक हत्तीनी उध्वस्त केले आहे. नुकसान भरपाई मिळत नसल्याने वर्षभर खायचे तरी काय? असा प्रश्न धनगरांच्यावर व शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे. नुकसान झालेल्या सर्व शेतकरी व धनगराना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संजय वाघमोडे संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यानी केली आहे.
No comments:
Post a Comment