तेऊरवाडीच्या गोल्डन मॅनने जिंकले ५ नॅशनल गोल्ड मेडल, जेष्ठ नागरिक रामराव गुडाजी यांची चमकदार कामागिरी - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2023

तेऊरवाडीच्या गोल्डन मॅनने जिंकले ५ नॅशनल गोल्ड मेडल, जेष्ठ नागरिक रामराव गुडाजी यांची चमकदार कामागिरी

 

तेऊरवाडीचे गोल्डन मॅन रामराव गुंडू गुडाजी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         यश मिळवण्याची मनामध्ये प्रचंड जिद्द असेल तर त्याला वेळ आणि काळही रोखू शकत नाही. अशाच एका ७२ वर्षांच्या जेष्ठ नागरिकाने कर्नाटक धारवाड येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय मास्टर गेम 2023 मध्ये धावण्याच्या स्पर्धेत तब्बल ५ गोल्ड मेडल जिंकण्याची सुवर्ण कामगिरी केली आहे. युवकांनाही लाजवेल अशा या तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील गोल्डन मॅनचे नाव आहे रामराव गुंडू गुडाजी.

       एक निवृत्त शिक्षक म्हणून आनंदाने जीवन जगत असताना रामराव गुडाजी यांना विविध स्पर्धामध्ये भाग घ्यायचा अनं यश मिळवायचा छंद जडला. गेल्या वर्षी त्यानी राज्य स्तरावर गोल्ड मेडल मिळवले होते. स्वतः विविध मर्दानी खेळात पारंगत असणाऱ्या श्री. गुडाजी यांनी धारवाड येथे आर एन शेट्टी स्टेडीअमवर ४ व ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या खुल्या राष्ट्रीय मास्टर गेम मध्ये भाग घेतला. यामध्ये २००, ३००, ४००, ८०० व १५०० मिटर धावण्यामध्ये सलग ५ राष्ट्रीय स्तरावरील गोल्ड मेडल जिंकली. 

        तसेच महाराष्ट्र संघाकडून १५०० मिटर रिले संघातून खेळताना बॉन्झ मेडल जिंकले. यावेळी सर्वोत्कृष्ठ खेळ खेळल्याने उत्कृष्ठ खेळाडूचा सन्मानही मिळवला. थायलंड येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी रामराव गुडाजी यांची निवड झाली आहे. अंगा अंगाड क्रीडा गुण ठासून भरलेल्या रामराव गुडाजी यांच्या या उज्वल यशाने तेऊरवाडीचे नाव सातासमुद्रापार पोहचले आहे. त्याच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment