चंदगड तालुक्यात पाटबंधारेच्या वसुली मोहीमेने शेतकरी हवालदिल, पाटबंधारे विभागाने बजावल्या नोटीसा - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2023

चंदगड तालुक्यात पाटबंधारेच्या वसुली मोहीमेने शेतकरी हवालदिल, पाटबंधारे विभागाने बजावल्या नोटीसा

 


नंदकुमार ढेरे / चंदगड - प्रतिनिधी 

       चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी वसूलीची मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पाणीपट्टी रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्याबरोबरच विद्युत मोटर आणि इंजिन जप्त करण्याचा इशाराही दिला गेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. २०११ पासूनच्या वसुलीचा तगादा लावला आहे. 

       सरासरी ३० हजारापासून २ लाखांपर्यंतच्या पाणीपट्टी वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत. मधल्या काळात आणि कोरोना काळात शासनाने पाणीपट्टी माफ केली जाईल, अशी घोषणा केली होती. तथापि त्या सवलत कालखंडाची वजाबाकी न करताच वसुलीच्या नोटीसा पाठवल्या आहेत. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची पाणीपट्टी परस्पर कापली आहे. काही शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीच्या रक्कमा कारखान्यांनी कपात केलेल्या आहेत. परंतु पाटबंधारे विभागाकडील थकबाकीत त्या रक्कमा वळत्या झाल्या नसल्याचीही उदाहरणे आहेत. 

       पाटबंधारेच्या काही कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी पोटी रक्कमा वसूल केल्या. प्रत्यक्षात त्या पाटबंधारे विभागात भरल्याच नाहीत, असेही घडल्याचे शेतकरी सांगतात. अनेक शेतकऱ्यांकडे भरणा पावत्या नाहीत. पण रक्कमा विश्वासाने अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केल्याचे शेतकरी सांगतात. अशी स्थिती असताना पाटबंधारे विभागाने थकबाकी वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांना" थकबाकीदार मानून महाराष्ट्र कायदा १९७६ कलम ४९ 'ज' अन्वये पाणी पुरवठा बंदबरोबरच पाणी उपसण्याची मोटर, इंजिन जप्तीचा प्रसंगी स्थावर, जंगम मालमत्तेची जप्तीचाही इशारा दिला गेला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment