चोरट्यांनी डीपी नजीक अशा प्रकारे सर्विस वायर कापून लंपास केली आहे.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
वीज पुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी २२ मोटर पंपच्या थ्री फेज सर्व्हिस वायर कापून लंपास केल्याची घटना किटवाड (ता. चंदगड) नजीकच्या दोन्ही धरण परिसरात गुरुवारी २ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री घडली. या वायरची किंमत चार लाख रुपये पर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कोवाड पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, कृष्णा खोरे अंतर्गत किटवाड नजीक दोन लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. या दोन्ही धरणांतील पाण्याचा लाभ किटवाड, कालकुंद्री, कुदनूर, खन्नेटी, होसूर, दिंडलकोप, राजगोळी, तळगुळी, दुंडगे कर्नाटकातील हंदिगनूर, बोडकेनहट्टी आदी दहा-बारा गावांच्या शेतीसाठी होतो. पाणी उपसा करण्यासाठी धरण क्रमांक १ वर सुमारे ५० तर धरण क्रमांक २ वर २७ मोटरपंप आहेत. यातील कुदनूर च्या बाजूस ७ व खन्नेटी, बोडकेनहट्टी बाजूस सुमारे १७ मोटरपंप आहेत. चोरीच्या रात्री इकडे लाईट नसल्याने कोणीही शेतकरी फिरकला नाही. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांच्या टोळीने लाखोंच्या वायरवर डल्ला मारला.या वायरची बाजारभावाप्रमाणे किंमत रु ४ लाखांपेक्षा अधिक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी नेहमी प्रमाणे सकाळी मोटर पंप सुरू करण्यासाठी गेले असता वायर चोरल्याचे निदर्शनास आले. घडल्या प्रकाराची फोन वरून माहिती मिळताच इतर शेतकरी घटना स्थळी दाखल झाले. यावेळी सर्वांचीच वायर चोरी झाल्याचे लक्षात आले. गत वर्षीही धरणावरील दोन तर किटवाड ते कालकुंद्री, कुदनूर पर्यंत ओढ्यावरील अनेक मोटर पंपच्या वायरची चोरी झाली होती. तर चार वर्षांपूर्वी कालकुंद्री हद्दीतील चक्क एक डीपी, ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी चोरुन नेला होता. चोरट्यांच्या सततच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वायर चोरी झालेल्या शेतकऱ्यांत सदानंद मारूती वर्पे, शिवाजी पाटील, राहुल हुदलिकर, तुकाराम जाधव, कलाप्पा सोनार, लक्ष्मण नांदवडेकर, म्हात्रू वर्पे, मल्लू नांदवडेकर, पुंडलिक सनदी, परसू हन्नुरकर आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे. चोरट्यांनी त्या रात्री सटूप्पा मोहनगेकर यांचा कट्टयावर ठेवलेला पाण्यातील मोटरपंप देखील लंपास करून आपल्या कौशल्याचा नमुना दाखवून दिला आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पोलीसांत तक्रार नोंदवली असून चोरांच्या टोळीचा पोलिसांनी लवकर शोध घेऊन अद्दल घडवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याप्रश्नी शेतकरी संघटनेच्या वतीने आवाज उठवला जावा अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment