गडावरील फाटक तलावात धोकादायकरीत्या उतरलेल्या मोकाट म्हशी |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगड वर वावरणाऱ्या मोकाट म्हशी व जनावरांमुळे ऐतिहासिक वस्तू व वास्तु आदी ठेव्यांची नासधूस सुरू आहे. या मोकाट म्हशींचा वन विभागाने संबंधितांना समज देऊन तात्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी ग्रामस्थ व पर्यटकांनी केली आहे.
मोकट म्हशी व रेड्यांनी ध्वज कट्टा व तोफांच्या बाजूच्या स्टील रेलिंगची अशी मोडतोड केली आहे. |
म्हशी मोकाट सोडलेल्या असल्याने नुकसान करत आहेत. गेली अनेक वर्षे फेब्रुवारी नंतर गडावर पाण्याचे दुर्भिक्ष असते. याचा फटका ग्रामस्थांसह इकडे येणाऱ्या हजारो शिवप्रेमी पर्यटकांना बसत आहे. गडावर सध्या वापरातील तीन तलाव असून यापैकी सर्वात मोठ्या असलेल्या फाटक तलावात सध्या या म्हशी उतरून पाणी खराब करत आहेत. हे पाणी खराब होऊन निरुपयोगी बनल्यास डिसेंबर पासूनच गडावर पाणीटंचाई निर्माण होईल अशी भीती व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी या मोकाट म्हशींनी किल्ल्याच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर समोरच ठेवण्यात आलेल्या ऐतिहासिक तोफांच्या बाजूचे स्टील रेलिंग मोडून टाकले आहे. तर मंदिरे व सर्वजनिक ठिकाणी शेण मुतामुळे घाणीचे साम्राज्य पसरत असल्याने येणाऱ्या पर्यटकांची कुचंबणा होत आहे. गावातील अन्य रहिवाशांच्या घरांच्या आवारातील कुंपण, परसातील केळी, बगीच्या व इतर झाडांचे नुकसान नित्त्याचे बनले आहे. गडाचे पावित्र्य टिकवणे, गडावरील ऐतिहासिक वास्तू व वस्तू यांची नासधूस, मोडतोड थांबवण्यासाठी तात्काळ उपायोजना करणे गरजेचे असून यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment