चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याची जीवन वाहिनी ताम्रपर्णी नदीतील गाळ न काढल्यास मनसेच्या वतीने खळ्ळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ताम्रपर्णी नदी ही चंदगड तालुक्यातील प्रमुख नदी आहे. या नदीच्या काठावर अनेक खेडी वसलेली आहेत. गेली अनेक वर्षे वाळू उपसा बंदीमुळे नदीचे पात्र माती, वाळू व गाळाने भरले आहे. परिणामी पावसाळ्यात थोड्या पावसातही नदीला महापूर येऊन नदीकाठावरील घरे, दुकाने यांचे लाखोंचे नुकसान होते. तसेच नदीकाठावरील हजारो हेक्टर जमीन ८ ते १५ दिवसांपर्यंत पाण्याखाली गेल्यामुळे ऊस व भात आदी पिकांचेही कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. संग्रहित छायाचित्र
ताम्रपर्णी नदी काठी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे जुन्या व नवीन पुलाच्या मध्ये नदीत मोठ्या प्रमाणात गाळ भरल्यामुळे वरून आलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे येथील व्यापारी व ग्रामस्थांवर संपूर्ण पावसाळ्यात पुराची टांगती तलवार लटकलेली असते.हे टाळण्यासाठी येथील गाळ काढणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी गेल्या काही वर्षात विविध संघटनांनी आंदोलने करून आवाज उठवला होता तथापि त्याची शासन व पाटबंधारे खात्याकडून दखल घेतली गेली नाही. मात्र यावर्षी संबंधित विभागाने गाळ न काढल्यास खळ्ळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा चंदगड तालुका मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील, चंदगड तालुका सचिव तुकाराम पाटील यांच्यासह विनायक पाटील, अमर प्रधान, संभाजी मनवाडकर, बाळकृष्ण गिरी, कल्लाप्पा सलाम, सुनील तळवार, किरण तळवार, सागर गवेकर, मष्णू आंबेवडकर, मिथुन पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment