वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलाची गरुडझेप, एमपीएससी तून बनला 'मंडल अधिकारी' - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2023

वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलाची गरुडझेप, एमपीएससी तून बनला 'मंडल अधिकारी'

एमपीएससीतून मंडल अधिकारी परीक्षा पास झाल्याबद्दल शुभम लाड यांचा महागाव येथे सत्कार करताना मान्यवर
महागांव : सी. एल. वृत्तसेवा
  एका गरीब वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलाने गरुड झेप घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा पास होत मंडळ अधिकारी पदाला गवसणी घातली. महागांव, ता. गडहिंग्लज येथील वृत्तपत्र विक्रेते दत्ता लाड यांचा मुलगा शुभम याने लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मंडल कृषी अधिकारी पदाच्या परीक्षेत जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले. 
   सद्यःस्थितीत तरुणाई चंगळवाद व व्यसनांच्या आहारी जात असताना शुभम लाडचे यश समाजातील युवक, युवतींना दिशादर्शक ठरणारे व कौतुकास्पद आहे. त्याने आपल्या यशाने महागाव व गडहिंग्लज तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. असे गौरवोद्गार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटक  अखलाकभाई मुजावर यांनी काढले ते शुभम लाड याच्या महागाव येथील सत्कार प्रसंगी बोलत होते. किरण कांबळे यांनी प्रास्तविक केले. मुजावर यांच्यासह सर्व वक्त्यांनी  दत्ता लाड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिवर मात करत खडतर संघर्षाने आपल्या मुलांना शिक्षणासोबत सुसंस्कारित करून अन्य पालकांसाठी एक आदर्श घालून दिल्याच्या भावना व्यक्त केल्या.
     यावेळी कु. शुभम त्याचे वडील दत्ता लाड तसेच महागांव येथील प्रसिद्ध लेखक व बैलगाडा शर्यत प्रेमी प्रा. रसुलभाई सोलापूरे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग चौगले मामा, ईश्वर कांबळे, विजय पांचाळ, रविंद्र भोसले , प्रकाश भोसले, विवेक शिंगटे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment