तिलारी घाटात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक अडकला, १० तास वाहतूक ठप्प, अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2023

तिलारी घाटात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक अडकला, १० तास वाहतूक ठप्प, अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा    
      तिलारी घाटात सिमेंट पोती वाहतूक करणारा ट्रक धोकादायक वळणावर अडकल्याने दोन्ही कडील वाहतूक १० ते १२ तास ठप्प झाली आहे. सायंकाळी ४ पर्यंत ट्रक न काढल्यामुळे बेळगाव, चंदगड, कोल्हापूर कडून दोडामार्ग, पणजी कडे जाणाऱ्या व तिकडून येणाऱ्या बस तसेच शेकडो वाहने दोन्ही बाजूस अडकून पडली होती. 
    १०-१२ तास वाहने अडकून राहिल्यामुळे बस व अन्य वाहनातील प्रवासी व लहान मुलांची अन्न पाण्या वाचून तडफड झाली. मंगळवारी दि. २१ रोजी पहाटे ४ च्या सुमारास अडकलेला ट्रक सायंकाळी साडेचार नंतर बाजूला करून वाहनांना वाट करून देण्यात आली. अवजड वाहनांना या घाटातून बंदी असतानाही वाहने जातातच कशी? असा सवाल करत प्रवासी वर्गातून सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.    तिलारी, दोडामार्ग घाट रस्ता कोल्हापूर, निपाणी, गडहिंग्लज, चंदगड, बेळगाव परिसराला गोवा राज्याशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. 
      या धोकादायक घाटातून अवजड वाहनांना बंदी आहे. तथापि गुगलवर सर्च केल्यानंतर हा जवळचा मार्ग दिसल्याने अनोळखी अवजड वाहन चालक आपली वाहने या मार्गे घेऊन येतात. त्यांना प्रतिबंध करणारे वाटेत  कोणीही नसल्याने ८-१० दिवसांत एक तरी वाहन घाटातील वळणावर अडकून वाहतूक ठप्प होते. याचा मनस्ताप एसटी, त्यातील प्रवासी व अन्य वाहनधारकांना बसतो. यापूर्वी तिलारी नगर येथे पोलीस चौकी होती तथापि सध्या ही चौकी बंद केल्याचे समजते. त्यामुळे पाटणेफाटा,  चंदगडहून येणारी वाहने मोटनवाडी फाट्यावरून बेधडक घाटात शिरत आहेत. वरील तिन्ही फाट्यांवर घाटातून अवजड वाहनांना प्रवेश बंदीचे फलक लावले तर पुढे येणारी वाहने तिथूनच परत जातील. मात्र असे फलक थेट घाटातच लावले आहेत.
      त्यामुळे या फलकांची 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी अवस्था झाली आहे. यासाठी आंदोलने व वृत्तपत्रातून अनेक वेळा बातम्या आल्यात तथापि याबाबत कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगडचे अभियंता इफ्तेकार मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत प्रस्ताव पाठवला आहे पण तिकडून आदेश आल्याशिवाय आम्ही फलक लावू शकत नाही असे सांगण्यात आले.           गोवा, सिंधुदुर्ग, दोडामार्ग कडून येणारी वाहने विजघर चेक पोस्टवर अडवली जातात तथापि ती 'सूचना देऊन' घाटात सोडली जातात, हे थांबले पाहिजे. तसेच तिलारी पोलीस चौकी पुन्हा सुरू करून तिथे एक कर्मचारी कायमस्वरूपी ठेवावा अशी मागणी होत आहे. एकंदरीत तिलारी- दोडामार्ग घाट जवळचा असला तरी प्रवासासाठी विश्वासार्ह राहिलेला नाही.

No comments:

Post a Comment