जिल्ह्यात २३ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर अखेर जमावबंदी, विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आदेश लागू - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2023

जिल्ह्यात २३ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर अखेर जमावबंदी, विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आदेश लागू


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

   मागील वर्षीच्या हंगामातील एफआरपीप्रमाणे प्रतिटन देय रक्कम रुपये ४०० तर चालू गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मिळावा. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याशिवाय राज्यात मराठा आरक्षणासाठीही उग्र आंदोलन सुरू आहे. या दोन्ही आंदोलनातून ऊस वाहतूक रोखणे, ऊस तोडणी बंद करणे, ट्रॅक्टर जाळणे, ठिय्या आंदोलन, चक्काजाम, आमरण उपोषण, साखळी उपोषणे, मोर्चा इत्यादी प्रकारची आंदोलने सुरू आहेत. 

     सध्या जिल्ह्यात यात्रा, उरुस, सण साजरे होणार असून या काळात वरील दोन आंदोलनांसह विविध पक्ष, संघटना यांच्याकडूनही विविध मागण्यांसाठी आंदोलने करण्यात येत आहेत. परिणामी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शासनाकडे सादर केला आहे. त्यास अनुसरून कोल्हापूर जिल्ह्यात २३ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर अखेर जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याचा आदेश संजय तेली अप्पर जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर यांनी काढला आहे. 

         बंदी काळात कलम ३७ (१) अ ते फ- नुसार शस्त्रे, काठ्या, शारीरिक इजा होईल अशा वस्तू बरोबर घेणे, स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा अन्य वस्तू फेकण्याची उपकरणे, क्षेपणास्त्रे जवळ बाळगणे, प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढणे, जाहीरपणे घोषणा करणे, सभ्यतेला धक्का पोहोचेल अशी प्रवृत्ती दिसून येणे, आवेशपूर्ण भाषण करणे, हावभाव करणे, फलकबाजी करणे आदी गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला असून कलम ३७ (३) नुसार जिल्ह्यात ५ अगर त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमवून मिरवणूक काढणे, सभा घेणे यावर बंदी घालण्यात आली आहे. यातून लग्न व इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा यांना वगळण्यात आले आहे. हा आदेश २३ नोव्हेंबर सकाळी ७ ते ७ डिसेंबर रोजी रात्री १२ पर्यंत लागु राहील असे आदेशात म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment