जहाल विषारी 'पट्टेरी मण्यार' चक्क कालकुंद्री - कागणी रस्त्यावर - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2023

जहाल विषारी 'पट्टेरी मण्यार' चक्क कालकुंद्री - कागणी रस्त्यावरकालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

   नाग व घोणस पेक्षा अति विषारी समजला जाणारा 'पट्टेरी मण्यार' साप चक्क कालकुंद्री- कागणी रस्त्यावर अवतरला...! निशाचर जातीतील हा साप आज दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंधार पडताच रस्त्यावर आला होता. सरस्वती विद्यालय कालकुंद्रीचे मुख्याध्यापक सुभाष बेळगावकर हे कालकुंद्रीहून कोवाड कडे दुचाकीवरून जात असताना अंधारात रस्त्यावर थांबलेला हा साप दुचाकीच्या उजेडात त्यांना दिसला. 

       हा जहाल विषारी पट्टेरी मण्यार असल्याचे त्यांनी पाहता क्षणीच ओळखले. पुढे गेलेली दुचाकी पुन्हा कालकुंद्रीच्या दिशेने वळवून सापावर लक्ष ठेवत  बाजूला थांबवली. यावेळी कोवाड कडून येत असलेल्या पत्रकार श्रीकांत पाटील यांना हाका मारून थांबवले. जवळ जाऊन मोबाईल बॅटरीच्या उजेडात सापाचे निरीक्षण केले असता मन्यार सुस्थितीत व धोकादायक दिसत असला तरी त्याच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्यामुळे तो मृत झाल्याचे लक्षात आले. यावेळी अन्य एका दुचाकी स्वाराच्या मदतीने मृत सापाला सावधगिरीने रस्त्यातून बाजूला काढण्यात आले. 

      कालकुंद्री- कागणी रस्त्यावर डॉक्टर  गुंडू काका यांच्या शेतानजिक हा साप आढळल्याने या परिसरात आणखी पट्टेरी मण्यार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे इव्हनिंग वॉक किंवा रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या शेतकरी व पादचाऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 

No comments:

Post a Comment